मुक्ता बर्वेचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई, दि. 7 : राष्ट्रीय पुरस्कार विजेती लोकप्रिय मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वेचा ‘माया’ या नवीन चित्रपट पुढच्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आदित्य इंगळे दिग्दर्शित या चित्रपटाच्या पोस्टरचे नुकतेच अनावरण करण्यात आले. मुक्ता बर्वे ‘माया’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरमध्ये मुक्तासोबत सिद्धार्थ चांदेकर, रोहिणी हट्टंगडी आणि डॉ. गिरीश ओक अशी तगडी कलाकारांची फळी दिसतेय. या चित्रपटाची कथा नेमकी काय असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. शालिनी सिनेमाज् आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स निर्मित ‘माया’ या सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झालंय. येत्या 27 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
विशेष म्हणजे प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटाने एक विक्रम केला आहे. या चित्रपटाची निवड 24व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले, “बिन लग्नाची गोष्टच्या सुखद अनुभवानंतर ‘माया’ हा चित्रपट घेऊन येत आहे. पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता आणि पुणे इंटरनॅशन फिल्म फेस्टिवलमध्ये निवड होणे या दोन्ही गोष्टी आमच्यासाठी अतिशय समाधानकारक आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.”
SL/ML/SL