कोकण किनारपट्टीवर MTDC सुरु करणार ‘कोस्टल टाईड पूल टुरिझम’

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडुन (MTDC) कोकण किनारपट्टीतील अनोख्या जागा शोधून त्याठिकाणी वैविध्यपूर्ण पर्यटन सुविधा विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. किनारपट्टी भागात सागरी भरती ओहोटीच्या नैसर्गिक चक्रात आणि सागरी समतल भागात दिसणारी जैवविविधता आता पर्यटकांना अनुभवता येणार आहे. कोकण किनारपट्टीच्या भागात वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींचे जग उलगडून दाखविण्यासाठी MTDCमार्फत कोकणाच्या किनारी भागातील ८ गावांमध्ये ‘कोस्टल टाईड पूल टुरिझम’ प्रायोगिक तत्त्वावर विकसित करण्यासाठी प्राथमिक मान्यता देण्यात आली आहे.
कोकण किनारपट्टीच्या भागात वैशिष्ट्यपूर्ण जीवसृष्टीचे जग दडलेले आहे. ते पर्यटकांना पाहता यावे, याकरिता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत हे कोस्टल पूल टुरिझम विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे किनारी भागात निसर्ग पर्यटनासह स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होणार आहेत. सागरी भागात ओहोटीच्या कालावधीत किनाऱ्यावर असलेला खडकाळ भाग पाण्याच्या वर दिसू लागतो. भरतीच्या वेळी हा भाग पाण्याखाली जातो. या निसर्गचक्रात किनाऱ्यालगत अत्यंत दुर्मिळ जैवविविधता आढळते. यावेळी या क्षेत्रात अनेक चमत्कारिक रचना पाहायला मिळतात. यालाच ‘रॉक टाईड पूल’ असेही म्हणतात.
हे रॉक टाईड पूल अनेक समुद्री जीवांसाठी लघुअधिवास असतात. यामध्ये खडकाळ किनाऱ्यांवर सूक्ष्म जीवांची घनता सर्वाधिक असते. त्याचबरोबर प्राणी व वनस्पतीच्या प्रजातींची उत्तम जैवविविधता आढळते. अनेक समुद्री जीव खडकाळ खळग्यांमध्ये तात्पुरता आसरा घेतात, अन्नाचा स्रोत म्हणून यांचा वापर करतात तर काही प्रजातींसाठी ही जागा प्रजननासाठी उत्तम पोषण निवारा असते. त्यामुळे ओहोटी आणि भरतीच्या कालावधीत ही सफर समुद्रातील जैवविविधतेच्या एका विलक्षण जगाची अनुभूती करुन देणारी असणार आहे. पर्यटकांना वेगळा अनुभव देणारी असेल. त्यामुळे या भागात पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे, यासाठी आता खारफुटी सवर्धन आणि संशोधन केंद्रानेही पुढाकार घेतला आहे. यामुळे हौशी पर्यटकांबरोबरच जैवविविधता संशोधक आणि निसर्ग अभ्यासक देखील अशा ठिकाणी भेट देण्यात उत्साह दाखवतील. परिणामी कोकण किनारपट्टीवरील अभ्यासू पर्यटकांच्या प्रमाणात देखील वाढ होणार आहे.
SL/ML/SL
16 May 2024