पंतप्रधान मोदींच्या ‘पंचाहत्तरी’निमित्त ७५ बसस्थानकांवर विशेष उपक्रम

 पंतप्रधान मोदींच्या ‘पंचाहत्तरी’निमित्त ७५ बसस्थानकांवर विशेष उपक्रम

मुंबई, दि. १८ : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘पंचाहत्तरी’निमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील प्रमुख 75 ST बसस्थानकांवर प्रवाशांसाठी मोफत ‘वाचनालय’ उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ST महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या 309 व्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निर्णयाची घोषणा केली. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर हे उपस्थित होते.

मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला गेला आहे.

या वाचनालयांमध्ये विविध नामवंत मराठी साहित्यिकांच्या कलाकृती उपलब्ध असतील. वि.स. खांडेकर, कुसुमाग्रज, पु.ल. देशपांडे, नामदेव ढसाळ, व.पु. काळे, विश्वास पाटील यांच्यासारख्या लेखकांचे साहित्य यात असतील. तसेच, MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) आणि UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मौल्यवान संदर्भग्रंथ देखील ठेवण्यात येणार आहेत.

मंत्री सरनाईक यांनी विश्वास व्यक्त केला की, हा ‘वाचन कट्टा’ मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपणारा ठरेल आणि समाजात वाचन संस्कृतीचा नवा सुवर्णप्रकाश पसरेल. ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरी निमित्त आम्ही जनतेसाठी ज्ञानाची ही अनमोल भेट देत आहोत,’ असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *