केंद्र सरकारकडून हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन तथा उडीद ही दोन पिके ९० दिवसांसाठी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान हे राज्य कृषी महोत्सवाच्या निमित्ताने परळीत आले तेव्हा धनंजय मुंडे यांनी याबाबत मागणी केली होती, तसेच दिल्ली येथे भेटूनही याबाबत पाठपुरावा केला होता.
केंद्र सरकारने महाराष्ट्र तसेच कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही 4892 रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे.राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी तसेच त्यांचे बाजारभाव पडल्याने नुकसान होऊ नये या दृष्टीने हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात यावी, त्याचबरोबर सोया मिल्क, खाद्यतेल, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यावर शुल्क लावावे तसेच सोयाबीन निर्यातीसाठी प्रतिक्विंटल किमान 50 डॉलर अनुदान द्यावे याबाबत मी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.
ML/ ML/SL
8 Sept 2024