पूर परिस्थितीमुळे MPSC परीक्षेची तारीख बदलली
मुंबई, दि. २६ : राज्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी ही परीक्षा येत्या रविवारी 28 सप्टेंबर 2025 ला होणार होती. पण आता ही परीक्षा 9 नोव्हेंबर 2025 ला होणार असल्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीपत्रक काढून सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत पस्तीस पैकी नऊ संवर्गातील एकूण 385 पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 घेण्यात येते.
महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. तर यासाठी जवळपास एक लाख 75 हजार 516 विध्यार्थी ही परीक्षा देणार होते.
विध्यार्थ्यांच्या मानसिकतेचा आणि राज्यातील पावसाची परिस्थिती पाहता परीक्षा काही काळ पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी अनेक विध्यार्थांसह राज्य सरकारने पत्राद्वारे केली होती. विद्यार्थी पावसाची परिस्थिती असल्यामुळे परीक्षा केंद्रापर्यंत जाऊ शकणार नाहीत. वाहतूकची सोय नाही. रस्ते खराब झाले आहेत. विद्यार्थ्यांचं हित लक्ष्यात घेता निर्णय घेतल्या बद्दल आयोगाचे आणि सरकारचे स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनकडून आभार मानण्यात आले आहे.
एमपीएससीने स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही आता 09 नोव्हेंबर, 2025 रोजी होणार असल्याने, याच दिवशी नियोजित असलेली महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 च्या तारखेतही बदल करण्यात येईल. गट-ब परीक्षेचा सुधारित दिनांक लवकरच एका स्वतंत्र शुद्धिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात येईल.