कचऱ्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन व्हावे यासाठी एमपीसीबीने केली कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सामूहिक जैव वैद्यकीय व्यवस्थापन केंद्रांमध्ये येणारा काही जैव वैद्यकीय कचरा हा २०१६च्या नियमानुसार वर्गीकरण होऊन येत नाही, असे सामूहिक जैव वैद्यकीय केंद्रांच्या भेटीमध्ये समोर आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) आयआयटी, मुंबईवर या सर्वेक्षणाची जबाबदारी सोपवली आहे. या कचऱ्याचे सुरक्षित आणि पर्यावरणदृष्ट्या योग्य पद्धतीने व्यवस्थापन व्हावे यासाठी एमपीसीबीने गुरुवारी कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. याचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर १ एप्रिलपासून कारवाई केली जाणार आहे.
या सामूहिक जैव वैद्यकीय केंद्रांमध्ये वर्गीकरण न केलेला जैव वैद्यकीय कचरा स्वीकारला जात असल्याचे निरीक्षण या केंद्रांना दिलेल्या भेटीत नोंदवण्यात आले. यामध्ये मानवी अवयव आणि सीरिंज या एकाच पिशवीत भरल्याचेही आयआयटीला आढळले. तसेच, रक्त लागलेला कापूस आणि इतर कापूस हेही एकत्र एकाच पिशवीत भरल्याचे समोर आले. हा कचरा एकत्र आल्यानंतर सामूहिक जैव वैद्यकीय केंद्रांमधील कर्मचारी याचे वर्गीकरण करतात. यामुळे या कर्मचाऱ्यांसह, नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरण या दोन्हींना धोका निर्माण झाला आहे. या कचऱ्याचे स्रोतापाशी विलगीकरण करणे, त्याचे बारकोडिंग होणे या बाबी गरजेच्या असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्पष्ट केले आहे. कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या आस्थापनांमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागांतील तसेच कमी खाटांच्या रुग्णालयांचा समावेश असल्याचे एमपीसीबीकडून सांगण्यात आले आहे.
MPCB issued strict guidelines for proper waste management
PGB/ML/PGB
29 March 2024