ईडीकडून खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकरला अटक

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाकाळात वरळी आणि दहिसर येथे उभारण्यात आलेल्या कथित जम्बो कोविड केंद्रांचे कंत्राट मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या आरोपावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि डॉ. किशोर बिसुरे या दोघांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने अटक केली आहे. डॉ. बिसुरे हे दहिसरच्या करोना फिल्ड रुग्णालयाचे प्रमुख होते. याच रुग्णालयाला संजीव जयस्वाल यांनी मंजुरी दिली होती. त्यात सुजित पाटकर यांनी मध्यस्थी केल्याचा ईडीला संशय आहे.
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी करोना काळात दिलेल्या वेगवेगळ्या कंत्राटांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. सुजित पाटकर यांनी मुंबईतील वेगवेगळ्या जम्बो करोना केंद्रात जून २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी काढलेल्या निविदा मिळवण्यासाठी ‘लाइफलाइन रुग्णालय मॅनेजमेंट सर्व्हिसेस’ ही कंपनी स्थापन केली. ही कंपनी आधी अस्तित्वात नसून केवळ कंत्राट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे तयार करण्यात आली आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.
सुजित पाटकर यांच्यासह लाइफलाइन रुग्णालय मॅनेजमेंटचे भागीदार डॉ. हेमंत गुप्ता,संजय शहा आणि राजू साळुंखे यांनी मिळून ३८ कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी तक्रारीत केला होता. कंपनीकडे वैद्यकीय मनुष्यबळ पुरवण्याचा अनुभव व ज्ञान नसतानाही अनुभव असल्याचं भासवून कंत्राट मिळवल्याचं सोमय्या यांच्या तक्रारीत म्हटले होते. त्यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलिसांनी याआधीच सुजित पाटकर आणि इतर भागीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. २४ ऑगस्ट २०२२ च्या एफआयआर च्या आधारे ईडीकडून मागील महिन्यात मालाड, सांताक्रुझ, परळ, वरळी याठिकाणी छापे टाकण्यात आले होते.
आज याच प्रकरणावरून ईडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि डॉ. किशोर बिसुरे या दोघांना अटक केली आहे. MP Sanjay Raut’s close associate Sujit Patkar arrested by ED
ML/KA/PGB
20 July 2023