खा. डॉ श्रीकांत शिंदे यांना संसद रत्न पुरस्कार…

 खा. डॉ श्रीकांत शिंदे यांना संसद रत्न पुरस्कार…

नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेनेचे कल्याण मतदारसंघाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांना नुकताच १४ व्या संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. १७ व्या लोकसभेत बजाविलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला असून तेलंगणाच्या राज्यपाल तमिळीसई सौंदरराजन यांच्या हस्ते शिंदे यांचा गौरव करण्यात आला. श्रीकांत शिंदे यांच्यासह राज्यातील इतरही अन्य खासदारांचा गौरव यावेळी करण्यात आला.

चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि ई मॅगझिन यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या संसद रत्न पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात या पुरस्काराचे वितरण तेंलगणाच्या राज्यपाल तमिळसई सौंदररोजन आणि केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे हंसराज अहिर यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायधीश संजय किशन कौल, गृहराज्यमंत्री अजय मिश्रा, संसदरत्न पुरस्कार समितीच्या प्रियदर्शनी राहुल, के.श्रीनिवासन आदी उपस्थित होते. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार संसद रत्न पुरस्काराची सुरूवात करण्यात आली आहे. संसद रत्न पुरस्कार हा त्याच खासदारांना प्रदान करण्यात येतो, ज्यांचे लोकसभेत उत्कृष्ट काम आहे. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी हिरीरिने सहभाग घेणाऱ्या खासदारांना हा सन्मान प्राप्त होतो.

डॉ.श्रीकांत शिंदे यांना संसदेतील त्यांच्या कामासाठी यंदाच्या या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१९ – २०२३ या कालावधीत डॉ.श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत ५५६ प्रश्न विचारले तर ६७ चर्चांमध्ये सहभागी झाले. याशिवाय १२ प्रायव्हेट मेंबर बिल त्यांनी समोर आणले आहे. त्यांची ही कामगिरी लक्षात घेता केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या नेतृत्वाखाली समितीने शिंदे यांची या पुरस्कारासाठी निवड केली.

हा पुरस्कार प्रदान करताना तेलंगणाच्या राज्यमाल तमिळसई सौदंरराजन म्हणाल्या की, ‘मला जेव्हा या कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालं तेव्हा आश्चर्य वाटलं की सर्व खासदारांमध्ये माझं नक्की काय काम ? केवळ पॉवरफुल व्यक्ती म्हणून मी इथे आले नाहीये तर माझ्याकडे असणाऱ्या मतदानाचा पॉवरफुल हक्काच्या जोरावर मी आज या कार्यक्रमाला हजर राहिले आहे. हा खासदारांचा दुसरा महत्त्वाचा पुरस्कार आहे, कारण त्यांच्या जनतेने त्यांना आधीच निवडून देत त्यांना पुरस्कार दिला आहे. महिला राज्यपालाने वुमन रिझर्व्हेशन बिल पास केले आहे, याचा आनंद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसंच मतदानाबाबात अधिक जागरूकता करून त्याची टक्केवारी वाढविण्याचे कामही आपले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

हा सामान्य शिवसैनिकांचा सन्मान –

कल्याण लोकसभेतील सर्व जनतेचा विश्वास आज सार्थकी लागला. हा पुरस्कार माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेचा आणि सामान्य शिवसैनिकांचा सन्मान करणार आहे. या पुरस्कारामुळे आपली जबाबदारी आणखीन वाढली असून जनतेचा हा विश्वास, प्रेम आणि आपुलकी यामुळेच याठिकाणापर्यंत पोहचू शकलो आहे. या पुरस्कारामुळे भविष्यात आणखीन जोमाने महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्याचे विश्वास मी यानिमित्ताने व्यक्त करतो, असे मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

इतरही खासदारांचा सन्मान

यावर्षी महाराष्ट्रातील शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, बंगालचे खासदार सुकांत मुझुमदार, भाजप खासदार सुधीर गुप्ता, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या डॉ. अमोल कोल्हे आणि काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा यांना सन्मानित करण्यात आले.

ML/KA/SL

17 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *