एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या जीवनावर बनणार चित्रपट
मुंबई, दि. ९ : मुंबई पोलिस दलातील प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या धडाकेबाज आणि वादग्रस्त कारकीर्दीवर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ,’अब तक 112′ असे ठेवण्यात आले असून, त्याचे दिग्दर्शन अभिजित पानसे करणार आहेत. चित्रपट निर्मितीची घोषणा के सेरा सेरा एंटरटेनमेंट कंपनीने केली आहे. प्रदीप शर्मा यांनी आपल्या सेवाकाळात 112 पेक्षा अधिक एन्काउंटर केले असून, मुंबईतील अंडरवर्ल्डविरुद्धच्या लढाईत त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. चित्रपटात त्यांच्या धाडस, संघर्ष आणि गुन्हेगारीविरुद्धच्या मोहिमांचे चित्रण करण्यात येणार आहे.दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी स्पष्ट केले की, हा चित्रपट केवळ एका पोलिस अधिकाऱ्याची कथा नाही, तर मुंबई शहरातील गुन्हेगारी, राजकारण आणि कायद्याच्या सीमारेषांमधील गुंतागुंतीचे वास्तव उलगडणारा अनुभव असेल.
प्रदीप शर्मा यांनीही या चित्रपटाबाबत भावना व्यक्त करताना सांगितले की, “माझे आयुष्य भीती, गुन्हेगारी आणि अंधाराविरुद्धची लढाई आहे. आता तो प्रवास चित्रपटाद्वारे दाखवला जाणार आहे, जो माझ्यासाठी भावनिक आणि अभिमानाचा क्षण आहे.
”हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता असून, निर्माते सतीश पंचरिया यांनी सांगितले की अब तक 112 हा केवळ एक चित्रपट नसून, धैर्य, शक्ती आणि सत्याच्या खोलीपर्यंत नेणारा एक अनुभव असेल.