जगप्रवासाला निघालेल्या भारतीयाच्या मोटरसायकलची इंग्लडमधून चोरी

लंडन, दि. ४ : जगाच्या प्रवासावर निघालेल्या योगेश अलेकरी (33) या भारतीय तरुणाची मोटारसायकल नॉटिंगहॅम येथे चोरीला गेली असून, त्यात त्याचा पासपोर्ट, पैसे, आणि अन्य महत्त्वाच्या वस्तू होत्या. अलेकरी यांनी मदतीसाठी सोशल मीडियावर आवाहन केले आहे. योगेश यांनी 1 मे, 2025 रोजी मुंबईहून त्यांचा जागतिक दौरा सुरू केला होता. 118 दिवसांत त्यांनी 17 देशांतून 24,000 किलोमीटरहून अधिक प्रवास केला आहे. पुढील टप्प्यात त्यांना आफ्रिकेकडे जायचे होते, परंतु 28 ऑगस्ट रोजी त्यांच्यासोबत ही घटना घडली. नॉटिंगहॅम येथील वूलॅटन पार्कमध्ये ते नाश्ता करत असताना, दिवसाढवळ्या चार चोरट्यांनी त्यांची मोटरसायकल चोरून नेली. या चोरीमुळे 15,000 पाउंडहून अधिक किमतीचे साहित्य, ज्यात लॅपटॉप, कॅमेरे, मोबाईल फोन आणि रोख रक्कम होती, ते सर्व गेले.
योगेशने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे, मात्र पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली नाही. केवळ तक्रार क्रमांक देऊन त्यांनी त्याची बोळवण केली. त्यानंतर निराश झालेल्या योगेशने सोशल मीडियावर सीसीटीव्ही फुटेज शेअर करून मदतीचे आवाहन केले आहे. “ही फक्त एक बाईक नव्हती, तर माझे घर, माझे स्वप्न होते,” असे म्हणत त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. या घटनेमुळे त्याचा प्रवास थांबला असून, तो आता बाईक आणि पासपोर्ट परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
SL/ML/SL