‘संगीत मानापमान ’ चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज

 ‘संगीत मानापमान ’ चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी संगीत नाट्यसृष्टीला दोन शतकांहून अधिक काळाचा समृद्ध वारसा लाभला आहे. यातील काही अजरामर नाट्यकृती आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. यातील एक नाटक म्हणजे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित संगीत मानापमान. १९११ मध्ये प्रथम रंगभूमीवर सादर झालेल्या या नाटकामध्ये बालगंधर्वांनी मुख्य भूमिका साकारली होती. हे नाटक आता चित्रपट रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अर्थांतच हे आव्हान पेलले आहे अभिनेता, दिग्दर्शक सुबोध भावे याने. आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुबोध भावे याने आपल्या आगामी ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज केले. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, सुबोध भावेचा चित्रपटातील एक वेगळा लूक आणि पेहराव पाहायला मिळत आहे. त्यासोबतच चित्रपटाची भव्यताही पाहायला मिळत आहे.

आपल्या पोस्टमध्ये अभिनेता सुबोध भावे म्हणतो, “गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या तुम्हा सर्वांना “संगीत मानापमान”च्या संपूर्ण संघाकडून मनःपूर्वक शुभेच्छा… येत्या दिवाळीत सजणार… मराठी परंपरेचा साज… मनामनात गुंजणार… सुरेल गीतांचा आवाज… ‘संगीत मानापमान’ १ नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!” २०१५ मध्ये रिलीज झालेला ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाच्या माध्यमातून सुबोधने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटाने सिनेरसिकांच्या मनावर राज्य केले. ‘कट्यार काळजात घुसली’नंतर ‘संगीत मानापमान’ या संगीतमय चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटाच्या शुटिंगला सप्टेंबर २०२३ पासून सुरूवात झाली होती. अखेर जानेवारी २०२४मध्ये ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचं शुटिंग पूर्ण झालं आहे. तेव्हापासून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल उत्सुकता होती.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनित, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या अजरामर कलाकृतीवरून प्रेरित, ‘संगीत मानापमान’ हा संगीतमय चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शनास सज्ज होणार आहे. प्रसिद्ध संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे.

SL/ML/SL
9 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *