पाच हजारांहून अधिक मुस्लिम महिला ‘मेहरम’शिवाय जाणार हज यात्रेला

 पाच हजारांहून अधिक मुस्लिम महिला ‘मेहरम’शिवाय जाणार हज यात्रेला

नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इस्लाम धर्मात हज यात्रा अत्यंत पवित्र मानली जाते. आयुष्यात एकदा ही यात्रा करावी अशी प्रत्येक मुस्लीम व्यक्तीची इच्छा असते. परंतु आजवर हज यात्रेकरिता महिलांवर अनेक निर्बंध लादले गेले होते. भारत सरकारच्या हज कमिटीनं गेल्या वर्षी एक नियम बदलला. त्यानुसार इस्लाम धर्मीयांतील महिला एकट्यासुद्धा हज यात्रेला जाऊ शकतात. याआधी‘हज’ला जाण्यासाठी महिलेसोबत कुणीतरी ‘मेहरम’ म्हणजेच पुरुष जोडीदार किंवा जवळचा पुरुष नातेवाईक असणं आवश्यक होतं. हा नियम आता हटवण्यात आल्याने यंदा पाच हजार १६२ भारतीय मुस्लीम महिला हज यात्रेला ‘मेहरम’शिवाय जाणार आहेत.

हज यात्रा २०२४ साठी ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सहा हजार ३७० महिलांचे अर्ज आले आहेत. तर, पाच हजार १६२ महिलांनी मेहरमशिवाय यात्रेला जाण्यासाठी अर्ज केला आहे, असं भारतीय हज समितीनं म्हटलं आहे. हज यात्रेला जाण्याकरता चिठ्ठी काढण्याची प्रक्रिया राबवली जाते. यावेळी ७० वर्षांवरील सर्व महिलांचे अर्ज आणि ज्यांना ‘मेहरम’शिवाय तीर्थयात्रेला जायचे आहे, त्यांचे अर्ज स्वीकारले गेले. त्यांच्यासाठी चिठ्ठ्या काढण्याची प्रक्रिया राबवली गेली नाही.

हज २०२४ साठी भारतातील एकूण एक लाख ७५ हजार ०२५ यात्रेकरूंचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. ‘हज कमिटी ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी लियाकत अली आफकी यांनी सांगितले की, मेहरमशिवाय हजला जाणाऱ्या ५,१६२ महिलांपैकी ३,५८४ केरळमधील, ३७८ तमिळनाडू, २४९ कर्नाटक, १६६ महाराष्ट्र, १४१ उत्तर प्रदेशमधून, तेलंगणातून १३०, जम्मू-काश्मीरमधून ८२, मध्य प्रदेशातून ७२, गुजरातमधून ६४, दिल्लीतून ५०, आंध्र प्रदेशातून ४४, पश्चिम बंगालमधून ४०, राजस्थानमधून ३३, बिहारमधून ३०, आसाममधून २९, पुद्दुचेरीमधून १९, छत्तीसगडमधून १४, उत्तराखंडमधून १०, झारखंडमधून नऊ, गोवा व ओडिशातील प्रत्येकी पाच, लडाखमधून तीन, लक्षद्वीपमधून दोन आणि हरियाणा, हिमाचल प्रदेश व पंजाबमधून प्रत्येकी एक अशा संख्येनं महिला जाणार आहेत.

हज यात्रेसाठी पुरुष जोडीदाराबरोबर जाता येत नसल्यास चार महिलांचा गट करून अर्ज करावा लागत असे. त्यामुळे महिलांना हज यात्रेला जाण्यासाठी मर्यादा येत होत्या. तसंच चार जणींच्या गटामधील एका महिलेनं जरी अर्ज मागे घेतला तरी उर्वरित महिलांचे अर्जही रद्द होत असत. तसंच मेहरम पूर्णवेळ या महिलेबरोबर राहत असल्यानं त्याचा खर्चही करावा लागत असे. परंतु, भारत हज कमिटीनं हा मेहरमचा पर्याय काढून टाकल्याने महिलांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आता त्या मोकळेपणाने हज यात्रेला जाऊ शकणार आहेत.

SL/KA/SL

30 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *