अमरावतीत 100 हून जास्त महिलांना विषबाधा
अमरावती, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावतीच्या जवळ असणाऱ्या नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या तब्बल १०० पेक्षा अधिक महिलांना विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास उघडकीस आली.अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीमधील गोल्डन फायबर कंपनीत ही घटना घडली आहे. सर्व महिलांवर अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही महिलांनी सांगितलेल्या माहितीनुसार, कंपनीतील पाणीतून किंवा नाश्तामधून ही विषबाधा झाल्याचा संशय आहे.
गोल्डन फायबर कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कामगार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्रास होत असलेल्या संबंधित महिला या सकाळी नेहमीप्रमाणे कामावर हजर झाल्या. त्यानंतर कंपनीमध्ये आल्यानंतर त्या पाणी प्यायल्या. पाणी पियाल्यानंतर काही महिलांना मळमळ जाणवू लागली. मात्र वातावरणातील फरक किंवा किरकोळ काही असावं असं समजून महिलांनी त्यांना होणाऱ्या मळमळ आणि डोकेदुखी या समस्यांकडे दुर्लक्ष केलं. मात्र एकामागे एक अनेक महिलांना हीच समस्या जाणवू लागली. अनेक महिला मळमळ आणि डोकेदुखीने त्रस्त झाल्या. एकाच वेळी तब्बल १०० हून अधिक महिलांना हीच समस्या जाणवू लागल्याने कंपनीतून गंभीर दखल घेण्यात आली. तात्काळ १०० हून अधिक महिलांना अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
विशेष बाब म्हणजे मनसेचे पदाधिकारी या महिलांच्या मदतीला धावून आले. त्यांनी तातडीने बाधित महिलांना रुग्णालयात दाखल केलं आहे. मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. “एकदम गंभीर घटना आहे. महिलांना सकाळी ९ वाजेपासून जेव्हा त्रास सुरु झाला, तर प्रत्यक्ष कंपनीने कुणाला बाहेर येऊ दिलं नाही तर डॉक्टर कंपनीत बोलवले. तर काही लोकांना सुट्टी दिली. काहींना सांगितलं तुम्ही डायरेक्ट घरी जा. मला काही मंडळी जेव्हा भेटले तेव्हा मी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात गेलो. पोलिसांना कंपनीत घेऊन गेलो. तिथे गेल्यावर कंपनीवाले बेजबाबदारपणे काम करत होते. कुणी आतमध्ये येऊ देत नव्हते. पोलीस स्वत: सर्वांशी बोलले आणि सर्वांना इथे रुग्णालयात घेऊन आलो”, अशी प्रतिक्रिया मनसेच्या पदाधिकाऱ्याने दिली. आता या प्रकरणात काही कारवाई केली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
SL/ML/SL
12 Jan. 2025