५ हजार कामगारांचा १६ एप्रिलला कामगार आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा.

 ५ हजार कामगारांचा १६ एप्रिलला कामगार आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा.

मुंबई, दि १३
महाराष्ट्रातील कामगारांच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने १६ एप्रिल २०२६ रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा मुंबईतील बांद्रा पूर्व येथील कामगार आयुक्त कार्यालयावर धडकणार असून यात सुमारे पाच हजार कामगार सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अनिल डुमणे व महामंत्री किरण मिलगिर यांनी सीएसटी येथील मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात अनेक वर्षांपासून कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहेत. सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यावर ठोस निर्णय घेतला जात नसल्याने कामगारांमध्ये अस्वस्थता आणि संताप वाढला आहे. त्यामुळे सरकारला जाब विचारण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात उद्योग, ऊर्जा, कृषी, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रांसाठी धोरणे असली तरी कामगारांसाठी स्वतंत्र धोरण नाही, अशी टीकाही त्यांनी केली. राज्य सरकार एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवून काम करत असताना या अर्थव्यवस्थेत कामगारांचे स्थान काय असेल, हा प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील कंत्राटी, बांधकाम, घरोघरी काम करणारे कामगार, आशा व अंगणवाडी सेविका, फेरीवाले, बीडी कामगार, रिक्षा-टॅक्सी चालक, जुने पेन्शनधारक तसेच विविध उद्योगांतील कामगार यांच्या मागण्या सरकारकडे प्रलंबित असल्याचे संघटनेने नमूद केले. या संदर्भात राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन २२ संघटनांच्या मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
मोर्चाच्या माध्यमातून राज्यासाठी स्वतंत्र कामगार धोरण तयार करणे, शासनातील कंत्राटी कामगारांसाठी हरियाणा पॅटर्न लागू करणे, प्रत्येक जिल्ह्यात कामगार राज्य विमा रुग्णालय सुरू करणे, बांधकाम कामगार मंडळातील भ्रष्टाचार थांबवणे, वीज कंपन्यांचे खाजगीकरण थांबवणे, EPS-95 पेन्शनधारकांना किमान ७५०० रुपये पेन्शन देणे, राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू करणे, तसेच विविध उद्योगांतील कायम व कंत्राटी कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या मोर्चात मोठ्या संख्येने कामगारांनी सहभागी होऊन सरकारकडे आपल्या हक्कांच्या मागण्या जोरदारपणे मांडाव्यात, असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.JS/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *