नवी मुंबईचे मोरबे धरण १००% भरले

पनवेल दि २०– रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेले नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण मागील सहा दिवस सुरू असलेल्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे १०० टक्के भरले आहे. मोरबे धरण परिसराच्या पाणलोट क्षेत्रात सततधार पाऊस सुरू आहे.
त्यामुळे बुधवार दिनांक २० ऑगस्ट रोजी पहाटे ३.१० वाजता मोरबे धरणाचे (१२ मी.× ३ मी. आकाराचे )
दोन्ही वक्राकार दरवाजे २५ सेंटिमीटरने उघडण्यात आले असून ११२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग धावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आला आहे.

या दरम्यान धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढणार असल्याने नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये असे जाहीर आवाहन खालापूर तहसीलदार व नवी मुंबई महानगर पालिका यांच्या मार्फत मोरबे धरणाच्या आजुबाजूला असणाऱ्या व नदीपात्राच्या बाजूला राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना करण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रतिदिन ४५० द.ल.लि. क्षमतेचे मोरबे धरण पूर्ण क्षमतेने (८८ मी.) भरलेले असून नवी मुंबईच्या जलसमृद्धतेत वाढ झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईत पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होणार आहे.ML/ML/MS