नूतन वर्षांपासून जलतरण तलाव सदस्यता त्रैमासिक व मासिक स्वरुपातही मिळणार
मुंबई दि.30( एम एमसी न्यूज नेटवर्क):
मुंबई महानगरपालिकेच्या 4 तरण तलावांसाठी आतापर्यंत केवळ वार्षिक सदस्यत्व देण्यात येत होते. मात्र,नूतन वर्षा पासून सभासदत्व घेऊ इच्छिणाऱ्यांना त्रैमासिक व मासिक सदस्यत्व देण्याचा मार्गही महानगरपालिका प्रशासनाने खुला केला आहे. त्याचबरोबर सदस्यत्व असलेल्या सभासदाला त्याच्यासोबत एका पाहुण्याला देखील पोहण्यास नेता येऊ शकेल. मात्र, त्यासाठी अग्रीम स्वरुपात दैनिक शुल्क भरणे आवश्यक असेल. तसेच ज्यांना सदस्यत्व मिळू शकणार नाही, अशा इच्छुकांसाठी ऑनलाईन प्रतिक्षा यादीचा पर्याय देखील आता खुला करण्यात आला आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या तरण तलावात एका विशिष्ट वेळी उपस्थित असणा-या सभासदांची माहिती तात्काळ उपलब्ध व्हावी, यासाठी ऑनलाईन पद्धतीने ‘लाईव्ह डॅशबोर्ड’ देखील लवकरच कार्यान्वित करण्यात येत आहे, अशी माहिती उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली.
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील 4 जलतरण तलावांचे सभासदत्व घेण्याच्या पद्धतीत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेने ऑनलाईन सभासद नोंदणी प्रणाली विकसित करून 23 ऑगस्ट पासून नागरिकांसाठी खुली केली होती. जलतरण तलावांच्या सदस्यत्वासाठी प्रथमच सुरु करण्यात आलेल्या या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेस उत्साहवर्धक प्रतिसाद लाभला. हा प्रतिसाद लक्षात घेऊन आता या सुविधा अधिक व्यापक करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
नवीन वर्षात म्हणजेच 3 जानेवारी 2023 पासून नव्याने सभासद नोंदणी सुरू करण्यात येत आहे. या सभासद नोंदणी प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
*https://swimmingpool.mcgm.gov.in/ या संकेतस्थळासह बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर (होम पेज) जलतरण तलाव वार्षिक सदस्यत्व नोंदणीची ‘लिंक’ देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर उघडणा-या वेब पेजवर अत्यंत सोपा व सुटसुटीत ऑनलाईन अर्ज आहे. हा अर्ज भरताना इतर प्राथमिक माहितीसह आपला आधार क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे.
* हा अर्ज भरुन सबमिट केल्यानंतर ऑनलाईन शुल्क भरणा करावा लागेल. हे ऑनलाईन शुल्क वार्षिक, त्रैमासिक, मासिक आणि दैनंदिन या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. तरण तलावाच्या आकारानुसार वेगवेगळी शुल्क रचना असून या अंतर्गत वार्षिक शुल्क 8000 ते 10,000 रुपये तर त्रैमासिक शुल्क हे 2230 ते 2900 रुपये इतके आहे. मासिक शुल्क 1300 रुपये असून सभासदासोबत येणा-या पाहुण्यांसाठी दैनिक शुल्क हे 240 रुपये असणार आहे.
• वरीलनुसार ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर व ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरणा केल्यानंतर निर्धारित कालावधीत जलतरण तलावाच्या कार्यालयात वैद्यकीय प्रमाणपत्र, आधारकार्ड व शुल्क भरल्याचा पावती क्रमांक सादर करावयाचा आहे. या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर अर्जदाराचे सभासदत्व सक्रिय (Active) केले जाणार आहे.
*. वार्षिक सभासदत्व उपलब्ध नसल्यास प्रतिक्षा यादीचा पर्याय असणार आहे. रुपये 500 इतके शुल्क भरून प्रतिक्षा यादीत नाव नोंदविता येईल. तसेच प्रतिक्षा यादीतून नाव कमी करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.
* वार्षिक सभासदत्व प्राप्त झालेल्या व्यक्तिला काही कारणास्तव सभासदत्व नको असल्यास, ते परत करण्याची सुविधा देखील आता उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्याचबरोबर सभासदत्व नूतनीकरण हे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा देखील आता कार्यान्वित करण्यात आली आहे.
*प्रत्येक सभासदाला त्याच्या सभासदत्वाचा तपशील पाहण्यासाठी स्वतंत्र लॉग-इन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
*सर्व तरण तलावांच्या वेळा या सकाळी 6 ते 11 व सायंकाळी 6 ते रात्रौ 10 वाजेपर्यंत असेल. महिला सभासदांसाठी राखीव सत्र सकाळी 11 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 5 ते 6 अशी असेल. सत्र पद्धत बंद करण्यात आली असून सभासद तरण तलावांच्या वेळांमध्ये तरण तलावाच्या क्षमतेनुसार केव्हाही येऊ शकतो.
*सभासदांसाठी असलेली पूर्वीची 45 मिनिटांची वेळ वाढवून 60 मिनिटे करण्यात आली आहे. सभासदाने 60 मिनिटांपेक्षा जास्त वापर केल्यास त्याचा सभासदत्व कालावधी गुणोत्तर प्रमाणात कमी करण्यात येईल. सभासदाला त्याच्या पाहुण्यांसाठी ऑनलाईन तिकिट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.
* प्रासंगिक तत्वावर तरण तलाव सुविधा वापरणाऱया अभ्यागतांसाठी विशेष नोंदणी सुविधा असेल. दुपारी 1 ते 4 ह्या कालावधीत संपूर्ण तरण तलाव आरक्षित करण्याची सुविधा असणार असून यासाठी प्रति तास 20430 रुपये इतके शुल्क असणार आहे.
*यापूर्वी सभासदत्वाची क्षमता पूर्ण झाल्याने थांबविण्यात आलेली सभासद नोंदणी प्रक्रिया 3 जानेवारी 2023 पासून पुनश्च सुरु करण्यात येत आहे. या अंतर्गत दादर पश्चिम परिसरातील महात्मा गांधी स्मारक ऑलिम्पिक जलतरण तलाव यासाठी 700 वार्षिक सभासद व 885 त्रैमासिक सभासद, चेंबूर पूर्व परिसरातील जनरल अरुणकुमार वैद्य ऑलिम्पिक जलतरण तलाव यासाठी 350 वार्षिक सभासद व 550 त्रैमासिक सभासद, दहिसर पूर्व परिसरातील मुरबाळीदेवी जलतरण तलाव यासाठी 330 वार्षिक सभासद व 275 त्रैमासिक सभासद आणि कांदिवली पश्चिम परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल ऑलिम्पिक जलतरण तलाव यासाठी 2178 वार्षिक सभासद व 550 त्रैमासिक सभासद इतक्या ऑनलाईन सभासदत्वासाठी नोंदणी प्रक्रिया 3 जानेवारी पासून सुरु होणार आहे.
या व्यतिरिक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे दहिसर (पश्चिम) येथील कांदरपाडा जलतरण तलाव, मालाड (पश्चिम) येथील चाचा नेहरु मैदान जलतरण तलाव, अंधेरी (पश्चिम) येथील गिल्बर्ट हिल जलतरण तलाव, अंधेरी (पूर्व) येथील कोंडिविटा गाव जलतरण तलाव, वरळी येथील वरळी जलाशय टेकडी जलतरण तलाव, विक्रोळी (पूर्व) येथील टागोर नगर जलतरण तलाव आणि वडाळा येथील वडाळा अग्निशमन केंद्र जलतरण तलाव या 7 ठिकाणी नवीन जलतरण तलाव विकसित करण्याचे कार्य प्रगतिपथावर आहे. सदर कार्य पूर्ण झाल्यानंतर व लोकार्पण झाल्यानंतर तेथील सभासद नोंदणी प्रक्रिया देखील सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती देखील बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे देण्यात आली आहे.
SW/KA/SL
30 Dec. 2022