राज्यात मान्सूनचा वेग मंदावला, IMD च्या नव्या अंदाजाने चिंता

मुंबई, दि. २ : वेळेआधीच १२ दिवस देशात दाखल झालेल्या मान्सूनचे राज्यासह देशात अनेक ठिकाणी थैमान घातले आहे. मराठवाड्या सारख्या दुष्काळी भागातील धरण प्रकल्पही मे महिन्यातच ओसंडून वाहू लागले आहेत. मात्र आता IMD ने जाहीर केलेल्या नवीन अंदाजाने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे कारण वेळेपूर्वीच पाऊस झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. घाईघाईने दाखल झालेल्या मान्सूनचा राज्यातील प्रवास काहीसा मंदावली आहे. कालच IMD ने १० जूनपर्यंत पेरण्यांची घाई करू असा सल्ला दिला आहे. मान्सूनच्या वाऱ्याचा जोर कमी झाला आहे, पुढील 5 ते 7 दिवस अशीच परिस्थिती असणार आहे, 10 ते 12 जूनपर्यंत पावसाची उघडीप असणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची कामं हाती घेतली पाहिजेत, असं पुणे हवामान विभागाचे हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मागील काही दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने सर्वांची चिंता वाढवली होती, यावर्षी वेधशाळेने ज्याप्रमाणे अंदाज वर्तवला आहे, त्याप्रमाणे पाऊस हा जास्त होण्याची शक्यता आहे, राज्याच्या अनेक भागात 108 टक्क्यांहून अधिक पाऊस होईल असा अंदाज आहे. सध्या पीक पेरणीच्या बाबतीत शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असं हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी म्हटलं आहे.
यंदा देशासह राज्यात मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला आहे, यावर्षी राज्यात पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा अधिक असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे, यंदा देशभरात 108 टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा पाऊस चांगला असल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.