मुंबईतील मोनो रेल्वे सेवा तात्पुरती बंद, तांत्रिक सुधारणा होणार

मुंबई, दि. १६ : मुंबई मोनोरेल सेवा २० सप्टेंबर २०२५ पासून तात्पुरती बंद करण्यात येणार असून, ही बंदी एक महत्त्वपूर्ण अपग्रेडच्या तयारीचा भाग आहे. गेल्या काही महिन्यांत दोन वेळा मोनोरेल मार्गातच बंद पडल्यामुळे अनेक प्रवासी अडकले होते आणि त्यांना तासोंतास रेस्क्यू करावे लागले. या घटनांमुळे मोनोरेलच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली होती. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA) ने मोनोरेलला अधिक सुरक्षित, वेगवान आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी ही सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या कालावधीत मोनोरेलच्या तांत्रिक प्रणालीत मोठे बदल केले जाणार आहेत. हैदराबादमध्ये विकसित केलेली स्वदेशी कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) प्रणाली प्रथमच मुंबई मोनोरेलमध्ये वापरण्यात येणार आहे. ही प्रणाली ट्रेन्समधील अंतर कमी करेल, सुरक्षा वाढवेल आणि सेवा अधिक अचूक व विश्वासार्ह बनवेल. सध्या ५ इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग्स ३२ ठिकाणी बसवण्यात आले असून, २६० वाय-फाय अॅक्सेस पॉइंट्स, ५०० RFID टॅग्स, ९० ट्रेन डिटेक्शन युनिट्स आणि अनेक WATC युनिट्स आधीच कार्यान्वित करण्यात आले आहेत.
रोलिंग स्टॉकच्या आधुनिकीकरणासाठी M/s MEDHA आणि SMH Rail यांच्या सहकार्याने १० नवीन ‘मेक इन इंडिया’ रॅक खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ८ रॅक डिलिव्हर झाल्या असून, ९वी रॅक तपासणीसाठी सादर करण्यात आली आहे आणि १०वी रॅक सध्या असेंब्लीच्या टप्प्यात आहे. याशिवाय जुन्या रॅकचे ओव्हरहॉल आणि रेट्रोफिटमेंटही करण्यात येणार आहे.
सध्या मोनोरेल सेवा सकाळी ६:१५ ते रात्री ११:३० पर्यंत चालते, त्यामुळे रात्री केवळ ३.५ तासच कामासाठी उपलब्ध असतो. दररोज पॉवर रेल बंद करून डिस्चार्ज व रिचार्ज करावा लागतो, ज्यामुळे कामाची गती मंदावते. सेवा पूर्णपणे बंद केल्याने नवीन रॅक आणि सिग्नलिंग सिस्टमचे इंस्टॉलेशन, कमिशनिंग आणि टेस्टिंग सातत्याने करता येईल. तांत्रिक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि त्यांची आगामी मेट्रो प्रकल्पांमध्ये पुनःतैनातीही शक्य होईल.
या कालावधीत चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक दरम्यान दोन्ही दिशांमध्ये मोनोरेल सेवा पूर्णपणे बंद राहील. नागरिकांनी प्रवासाची योजना करताना याची नोंद घ्यावी, असे आवाहन MMRDA ने केले आहे. उपमुख्यमंत्री आणि MMRDA अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “ही तात्पुरती बंदी मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे. नवीन रॅक, उन्नत सिग्नलिंग आणि जुन्या रॅकचे नूतनीकरण यामुळे नागरिकांना अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा मिळेल.” मेट्रोपॉलिटन कमिश्नर डॉ. संजय मुखर्जी यांनीही या निर्णयाचे समर्थन करत नागरिकांच्या संयमाचे कौतुक केले आणि आश्वासन दिले की, “मोनोरेल पुन्हा सुरू झाल्यावर ती नव्या आत्मविश्वासाने मुंबईकरांची सेवा करेल.”
ही तात्पुरती बंदी म्हणजे एक दूरदृष्टीपूर्ण पाऊल असून, अपग्रेडनंतर मोनोरेल पूर्व मुंबईच्या कॉरिडॉरमध्ये सार्वजनिक वाहतुकीस अधिक बळकटी देईल. MMRDA च्या या निर्णयामुळे भविष्यातील मोनोरेल सेवा अधिक सुरक्षित, गतिमान आणि विश्वासार्ह होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.