एक डेपो, चार मेट्रो मार्गिका, मोघरपाडा येथील जमीन हस्तांतरित

 एक डेपो, चार मेट्रो मार्गिका, मोघरपाडा येथील जमीन हस्तांतरित

मुंबई दि १५ – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथे एकूण १७४.०१ हेक्टर क्षेत्रफळ जमीन अधिकृतपणे ताब्यात घेतली आहे. या जागेवर जागतिक दर्जाचा, एकात्मिक मेट्रो कार डेपो उभारण्यात येणार आहे. हा डेपो मेट्रो ४, ४ए, १० आणि ११ या मार्गिकांसाठी एक केंद्रीय संचालन व देखभाल केंद्र असून, सीएसएमटी ते मीरा रोड दरम्यान एकूण ५५.९९ किमीच्या मेट्रोमार्गाचे संचालन येथून होईल.

सर्व्हे क्रमांक ३०मधील (जुना सर्वे क्रमांक २८) ही जमीन महाराष्ट्र शासनाच्या १६ ऑक्टोबर, २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार एमएमआरडीएला “आहे त्या स्थितीत” हस्तांतरित करण्यात आली असून महत्त्वाच्या सार्वजनिक परिवहन पायाभूत सुविधेला प्राधान्य देण्याच्या राज्य शासनाच्या भूमिकेचे हे द्योतक आहे.

या चारही मार्गिकांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) यांनी तयार केला होता. एकात्मिकता आणि कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी मोघरपाडा येथे एकच संयुक्त डेपो प्रस्तावित करण्यात आला होता.

मोघरपाडा मेट्रो डेपोची धोरणात्मक भूमिका

मोघरपाडा मेट्रो डेपो हे मेट्रो ४, ४ए, १० आणि ११ या मार्गिकांसाठी एक महत्त्वाचे नियंत्रण व देखभाल केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून अखंडित आणि उच्च दर्जाची सेवा सुनिश्चित करण्यात येईल. या डेपोच्या माध्यमातून प्रामुख्याने खालील जबाबदाऱ्या पार पाडण्यात येतील :-

• मेट्रो सेवा बंद असलेल्या वेळेत गाड्या उभ्या करणे, जेणेकरून गर्दीच्या वेळेस त्या तत्परतेने वापरता येतील.
• सर्व मेट्रो गाड्यांची मोठी दुरुस्ती (हेव्ही ओव्हरहॉल) व नियमित देखभाल
• उपकरणे काढणे आणि नवीन बसवणे आणि त्यानंतर सुरक्षेसाठी आवश्यक ती पूर्ण चाचणी करणे
• ट्रेन व डेपो प्रणालींचे कामकाज सुरळीत करण्यासाठी ऑपरेशन कंट्रोल सेंटर (ओसीसी) आणि डेपो कंट्रोल सेंटर(डीसीसी) यांच्यामार्फत एकात्मिक नियंत्रण कार्यप्रणाली

या सर्व सुविधांमुळे मुंबई मेट्रो नेटवर्कमध्ये दीर्घकालीन सेवा कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि भविष्यातील विस्तारक्षमता यांचा मजबूत पाया घातला जाईल.

मोघरपाडा मेट्रो डेपोमधील महत्त्वाच्या सुविधा

मोघरपाडा डेपोमध्ये पुढील घटक असतील :

• मोठ्या देखभालीसाठी १० वर्कशॉप ट्रॅक
• दैनंदिन आणि नियमित तपासणीसाठी १० निरीक्षण ट्रॅक
• रात्री गाड्या उभ्या करण्यासाठी ६४ स्टेबलिंग ट्रॅक
• चाकांचे प्रोफाइलिंग करण्यासाठी अंडर-फ्लोअर व्हील लेथ
• गाड्यांची नियमित स्वच्छता करण्यासाठी ऑटो आणि उच्च क्षमता असलेली वॉश यंत्रणा
• अंडरफ्रेम व छतावरील उपकरणांवरील धूळ काढण्यासाठी ब्लो-डाऊन प्लांट
• कॅटेनेरी वाहने उभी करण्यासाठी व देखभालीसाठी सीएमव्ही वर्कशॉप
• संचालनासाठी डेपो कंट्रोल सेंटर (डीसीसी) आणि प्रशिक्षण कक्ष
• आवश्यक डेपो कर्मचाऱ्यांसाठी निवासी सुविधा

निविदा मंजुरी आणि बांधकामाची सद्यस्थिती

निर्धारित निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या २७६व्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाल्यानुसार एमएमआरडीएने ₹९०५ कोटींचे (सर्व करांसह) कंत्राट मे. एसईडब्ल्यू–व्हीएसई जॉइंट व्हेंचरला दिले आहे.

१३ जून, २०२५ रोजी ‘नोटिस टू प्रोसिड’ (एनटीपी) जारी करण्यात आली असून, जमीन ठेकेदाराच्या ताब्यात अधिकृतपणे देण्यात आली आहे. डेपोचे बांधकाम तत्काळ सुरू होणार आहे.

शेतकरी केंद्रित पुनर्वसन मॉडेल

सिडकोच्या समतोल विकासाच्या मॉडेलशी सुसंगत अशी भरपाई पद्धत एमएमआरडीएने स्विकारली आहे. या अंतर्गत प्रकल्पग्रस्तांना विकसित भूखंड देण्यात येतात :

• पट्टेधारक शेतकऱ्यांना त्यांच्या मूळ जमीनक्षेत्राच्या २२.५% भूखंड
• अतिक्रमणधारकांना त्यांच्या मूळ जमीनक्षेत्राच्या १२.५% भूखंड

मुख्य रस्ते १८ मीटर रुंद आणि अंतर्गत रस्ते १२ मीटर रुंद ठेवून, सर्व भूखंडांमध्ये सुलभ कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करणारा एक मुख्य आराखडा तयार करण्यात आला आहे. हे विकसित भूखंड ३६ महिन्यांच्या आत प्रदान करण्यात येणार आहेत.

पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी, २२ जानेवारी आणि ७ फेब्रुवारी, २०२५ रोजी सन्माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक सार्वजनिक सल्लामसलत बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. यात शेतकऱ्यांच्या शंका व अडचणींचे निरसन करण्यात आले. त्यानंतर १९८ ऑफर लेटर्स (१६७ पट्टेधारकांना आणि ३१ अतिक्रमणधारकांना) वितरित करण्यात आली.

परिवर्तन घडवणारा प्रभाव

मेट्रो ४ आणि ४ए मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर पुढील सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत :
• सध्याच्या प्रवासाच्या वेळेत तब्बल ५०% पर्यंत घट
• दररोज सुमारे १२ लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करतील
• आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या भागांना मेट्रोची कनेक्टिव्हिटी मिळेल
• वाहतूक कोंडी आणि प्रदूषणात लक्षणीय घट
• पूर्व उपनगर आणि ठाणे परिसरात विकासाला चालना

मुंबईच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला बळकटी

मोघरपाडा डेपो ही ‘महत्त्वाची शासकीय प्राथमिकता’ असून, मुंबईच्या एकात्मिक शहरी वाहतूक धोरणातील एक प्रमुख केंद्रबिंदू आहे. या डेपोमुळे खालील उद्दिष्टांचा पाया घातला गेला आहे :
• सुरळीत मल्टिमोडल (बहु-मार्गीय) कनेक्टिव्हिटी
• ५५.९९ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेची अखंड व विश्वासार्ह सेवा
• शाश्वत पायाभूत सुविधांद्वारे आर्थिक प्रगतीला चालना. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *