केईएम रूग्णालय नेत्र शल्यचिकित्सा विभागामध्ये ‘मॉड्युलर ऑपरेशन’ सुविधा

मुंबई दि.22(एम एमसी न्यूज नेटवर्क): शहरात डोळ्यांशी संबंधित उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रूग्णांना अद्ययावत स्वरूपाची अशी सुविधा देण्यासाठी पालिकेच्या केईएम रूग्णालयाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. रूग्णालयातील नेत्र शल्यचिकित्सा विभागात ‘मॉड्युलर ऑपरेशन थिएटर’च्या सुविधेची सुरूवात आज करण्यात आली . त्यामुळे अतिशय अद्ययावत अशा उपकरणांचा समावेश असलेल्या मॉड्युलर ऑपरेशन थिएटरच्या माध्यमातून अधिकाधिक रूग्णांना यापुढील काळात दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे. केईएम रूग्णालयातील नेत्र विभागाचे माजी विभागप्रमुख आणि प्राध्यापक डॉ. रूमी जहांगीर यांच्या हस्ते आणि रुग्णालय अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्या उपस्थितीत या सुविधेची सुरूवात झाली.

रूग्णालयात उपलब्ध करून देण्यात आलेल्या ‘अद्ययावत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर’मुळे शस्त्रक्रियांची प्रक्रिया अधिक सुकर आणि वेगाने होण्यासाठी मदत होणार आहे. आतापर्यंत नेत्र शल्यचिकित्सा विभागात महिन्याला सरासरी २२० शस्त्रक्रिया पार पडत होत्या. नव्याने अद्ययावत उपकरणामुळे महिन्याल ३०० शस्त्रक्रिया करणे शक्य होईल, अशी माहिती नेत्र शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश इंगोले यांनी दिली.

केईएम रूग्णालयाच्या मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये अद्ययावत उपकरणांसोबतच मॉड्युलर सेटिंग आणि लॅमिनर एअर फ्लो यासारख्या सुविधा आहेत. त्यामुळे शस्त्रक्रिया अधिक नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी मदत होणार आहे. नेत्र विभागामध्ये मोतिबिंदू (कॅटॅरॅक्ट), ग्लाऊकोमा, स्क्विंट, रेटिना, कॉरेना, लहान मुलांशी संबंधित डोळ्यांच्या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात.

निर्जंतुकीकरणासाठी हाय स्पीड स्वरूपाची स्वयंचलित ऑटोक्लेव्ह संयंत्र देखील संयोग ट्रस्टच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपकरणामुळे शस्त्रक्रियांची संख्या वाढतानाच रूग्णांना अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी मदत होणार आहे.

ML/SL/SL

22 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *