मोदींचे पवारांवर थेट आरोप , पवारांचे प्रत्युत्तर
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आता नेतेमंडळींनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला सुरूवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भोपाळमध्ये बोलताना राष्ट्रवादीचे कॉंग्रेस पक्षावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा थेट आरोप केला. याला शरद पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आज भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांना दृकश्राव्य पद्धतीने मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी खास करुन शरद पवार यांच्यावर तसंच महाराष्ट्रातील विविध घोटाळ्यांचा संदर्भ देत विरोधकांवर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी म्हणाले, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर तब्बल ७०,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे, असं एकही क्षेत्र नाही जिथे काँग्रेसने घोटाळा केला नसेल. यावर शरद पवार यांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे. “पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी स्वतः विचार करण्याची गरज आहे.शिखर बँकेचा त्यांनी उल्लेख केला. मी कधी शिखर बँकेचा मेंबर नव्हतो.कर्ज कधी मी घेतले नव्हते. मी त्या संस्थेचा कधीच सदस्य नव्हतो. तेव्हा याबाबत बोलणे कितपत ठीक आहे ?. सिंचनाच्या बाबत त्यांनी वक्तव्य केलं मात्र ते खरे नाही ” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
शरद पवार पुढे म्हणाले “त्यांनी जो उल्लेख केला त्यात शिखर बँक हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यात माझा शिखर बँकेसोबत काही संबंध नाही हे स्पष्ट झालेले आहे. सुप्रिया सुळे यांचे नाव घेतले त्यांचे काही कारण नाही, अशा इन्स्टिट्यूट सोबत त्या राहत नाहीत हे बहुतांश लोकांना माहीत आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर देशातील विरोधी पक्षाचे लोक एकत्र येतात, देशाच्या समस्येबाबत चर्चा करतात, ही गोष्ट काही लोकांना पटत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे विधाने केली जातात, यापेक्षा अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही.” असे चोख उत्तर पवारांनी दिले आहे.
SL/KA/SL
27 June 2023