मोदींची हुकूमशाही रोखायला एकत्र या!

 मोदींची हुकूमशाही रोखायला एकत्र या!

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज महाविकास आघाडीतील नेत्यांना पत्र पाठवले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जून खरगे यांना त्यांनी पत्र पाठवल्याचे त्यांनी ट्विट करत सांगितले.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या ३ घटक पक्षांमधील जागा वाटपाबाबत महाराष्ट्रात वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. या अटकळींचा कितीही गोंगाट सुरू असला, तरी देशातील सर्वाधिक जागा निवडून देणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या राज्यातील, महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीकडून कोणताही ठोस निर्णय होताना दिसत नसल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींना सत्तेतून बेदखल करण्यासाठी ४८ जागांचे महत्त्व लक्षात घेता तसेच उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार अशा महत्त्वाच्या राज्यांमध्ये जागा वाटपाबाबत इंडिया आघाडी अंतर्गत असणाऱ्या निर्णयाचा अभाव पाहता वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीने व्यवहार्य व “संघर्षमुक्त”  १२+१२+१२+१२ असे सूत्र २६ डिसेंबर २०२३ रोजी सुचवले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

लोकसभेसाठी १२+१२+१२+१२ हे सूत्र आम्ही केवळ मविआ व इंडिया आघाडीत समावेशासाठीच नाही, तर मविआ अंतर्गत सर्व वाद संपवण्याच्याही दृष्टीने प्रस्तावित केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“१२ + १२ + १२ + १२” फॉर्म्युला हा केवळ नरेंद्र मोदींना हटवण्यासाठी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्याची आमची इच्छा आणि स्वारस्य पुन्हा व्यक्त करण्यासाठी नाही, तर जागा वाटपाबद्दल मविआमधील सर्व मतभेद दूर करण्यासाठी सुद्धा प्रस्तावित करण्यात आला असल्याचा पुनरुच्चार त्यांनी पत्रात केला आहे.

महाविकास आघाडीमधील पक्ष – शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आगामी लोकसभा निवडणुका एकत्र आणि समान भागीदार म्हणून समान संख्येने जागांवर लढवाव्यात ही वंचित बहुजन आघाडीची इच्छा आहे.

श्री. उद्धव ठाकरे, श्री. शरद पवार आणि श्री. मल्लिकार्जुन खर्गे – आमच्या प्रस्तावित फॉर्म्युलावर गांभीर्याने विचार करा आणि प्रतिसाद द्या, अशी विनंती त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्र आमच्या १२ + १२ + १२ + १२ च्या प्रस्तावित फॉर्म्युल्याबद्दल तुमच्या अधिकृत भूमिकेची आतुरतेने वाट पाहत आहे. मला मनापासून आशा आहे की, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी विचारविनिमय करून निर्णय घेतले जातील आणि मोदींचा पराभव व्हावा केवळ याला एकमेव आणि एकमेव प्राधान्य दिले जाईल. असा आशावादही त्यांनी या पत्रातून व्यक्त केला आहे.

ML/KA/PGB 28 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *