मोदींनी महागाई कमी करण्याचे दिलेले शब्द १० वर्षात पाळले नाही
जळगाव, दि.३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महागाई किती वाढली आहे. मला सत्ता द्या असे त्यांनी दहा वर्षापूर्वी सांगितले होते. पन्नास दिवसात महागाई कमी करणार असल्याचं सांगितलं होते. मात्र दहा वर्षात महागाई कमी नाही झाली तर वाढली आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदीवर केला आहे. आज चोपडा येथे महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पवार बोलत होते.
पवार पुढे म्हणाले की, जळगाव जिल्हा राज्यात महत्वाचा जिल्हा आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणारा हा जिल्हा आहे. महात्मा गांधी यांनी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी चळवळ उभी केली होती. पहिले काँग्रेसचे अधिवेशन फैजपूरमध्ये झाले होते. देशासाठी काम करताना कोणती तमा बाळगली नाही, असे नेते या ठिकाणी होते. महाराष्ट्राची विधानसभा किती उत्तमरित्या चालविता येते हे अरुणभाई गुजराती यांनी दाखवून दिले होते असेही ते म्हणाले.
जनतेची सेवा केली पाहिजे या जिल्ह्यातून विविध क्षेत्रात पाहायला मिळाले आहे. विधायक कामाचा पुरस्कार करणारा जिल्हा आहे. निवडणुका येतात जातात, पण जनतेच्या समस्या काय त्या कशा सोडवायला हव्या ते पाहायला पाहिजे. आज काय चित्र दिसत आहे? लोकांनी श्रीराम पाटील यांच्यासारखा काम करण्याची इच्छा असणार नवखा उमेदवाराला साथ द्यायला पाहिजे. आज देशात अनेक प्रश्न आहेत. त्याची चिंता लोकांना आहे. दहा वर्षात मोदी यांच्या हातात सत्ता आहे. मत मांडायचा त्यांना अधिकार आहे. पण ते सत्यावर आधारित असले पाहिजे. पण तसे किती दिसत आहे याचा विचार केला पाहिजे.असे पवार यानी म्हटले आहे.
शरद पवार म्हणाले की, दोन कोटी रोजगार देणार असल्याचे सांगत होते. आज काय परिस्थिती आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. दोन कोटीची केवळ घोषणा होती. मोदी साहेब केवळ घोषणाच करतात. सत्ता देशाच्या हितासाठी असायला पाहिजे. केजरीवाल यांनी त्यांच्यावर टीका केली तर त्यांना जेलमध्ये टाकले. सत्ता या साठी वापरायची असते का? राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराने या देशासाठी त्याग केला आहे, सेवा केली आहे. तुम्ही त्यांच्यावर टीका करत आहात.
इंदिरा गांधी यांनीही देशासाठी काम केलं, योगदान दिले. त्याचा अभिमान असायला पाहिजे मात्र हे त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान मोदी आमच्यावरही टीका करत आहेत. मोदी केवळ टीका टिप्पणी करून आपल्या पदाची गरिमा कमी करत आहेत. दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मात्र मोदी यांना त्यांचे प्रश्न काय आहे? हे समजून घ्यावे, असे वाटले नाही. म्हणून आज शेतीची ही अवस्था झाली आहे.असेही शरद पवार म्हणाले.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट म्हणणाऱ्यांनी उत्पन्न निम्मे केले
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे म्हणणाऱ्यांनी त्यांचे खर्च वाढवून उत्पन्न निम्मे केले. महाराष्ट्रातील कुठल्याही भाजपच्या नेत्याला फोन करून विचारा, कसा आहे यंदा? समोरून उत्तर येईल, जरा अवघडच आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य किती कष्टाने असे मिळालेल्या आहे हे तुम्ही-आम्ही जाणतो. मात्र या निवडणुकीनंतर ते स्वातंत्र्य राहील का? हा खरा प्रश्न आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटील म्हणाले की, रावेर मतदारसंघात बदल अटळ आहे. तुम्ही राम राम करता, आम्ही श्रीरामच आणलेले आहेत. तुम्ही हात दाखवा तिथे गाडी थांबवेल. तुमची सेवा करेल. सर्वात महत्वाचे म्हणजे केळी बागायतदारांच्या उन्नतीसाठी कोल्ड स्टोरेज, कोल्ड चेन निर्माण करतील. कापसाचा दर वाढवण्यासाठी दिल्लीत आवाज उठवतील. शेतकऱ्यांच्या हक्काच्या उमेदवाराला बहुमताने निवडून द्या असेही जयंत पाटील यानी म्हटले आहे.
ML/ML/SL
3 May 2024