मोदी सरकारने आदिवासींचे जल, जंगल, जमीनचे अधिकार हिरावून घेतले!
वाशिम, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आदिवासींच्या हक्क व अधिकारासाठी आदिवासांचे जननायक बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांविरोधात मोठा संघर्ष केला. बिरसा मुंडा यांची आज १२२ वी जयंती आहे पण आदिवासींना त्यांचे हक्क मिळू दिले जात नाहीत. काँग्रेस सरकारने आदिवासींच्या हिताचे निर्णय घेतले होते पण वन अधिकार अधिनियम २००६ व भूमी अधिग्रहण कायदा २०१३ यातून त्यांना हक्क मिळाले होते पण मोदी सरकार आल्यापासून हे कायदे कमजोर करण्यात आलेत. आदिवासींची जमीन बड्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचे काम केले जात आहे. आदिवासींच्या जल, जंगल, जमिनचे त्यांचे हक्क मोदी सरकार हिरावून घेत आहे असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
वाशिम येथे पत्रकारांशी संवाद साधताना जयराम रमेश म्हणाले की, भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदिवासींना वनवासी संबोधते, आदिवासी नाही. मोदी सरकार हे आदिवासींची सर्व जमीन जबरदस्तीने घेऊन उद्योगपतींना देऊन त्यांच्या हक्कांवरच गदा आणत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु या प्रकरणात लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा काँग्रेसने गडचिरोली जिल्ह्यातील मेंडालेखा गावात एका कार्यक्रमाच्या माध्यमातून बांबू व्यापारावरील नियंत्रण ग्रामसभेला देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहमंत्री आर आर पाटील यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेतला होता पण त्यानंतर आलेल्या भाजपाच्या फडणवीस सरकारने हा निर्णय फिरवला व पुन्हा हे अधिकार वन विभागाला दिले.
ग्रामसभा सशक्त बनवणे ह्याला काँग्रेसचे प्राधान्य आहे. आदिवासांना त्यांचे हक्क मिळावे हीच काँग्रेसची भूमिका आहे पण भाजपा आदिवासांच्या हिताच्या आड येत आहे.
भारत जोडो यात्रेचा आजचा ६९ वा दिवस आहे. या पदयात्रेत दररोज समर्थन वाढत आहे. त्यातही महिलांचा या पदयात्रेतील सहभाग हा लक्षणीय आहे. हजारोंच्या संख्येने महिला, लहान मुली पदयात्रेत मोठ्या आत्मविश्वासाने सहभागी होत आहेत असे जयराम रमेश म्हणाले.
यात्रेत सहभागी झालेल्या काँग्रेसच्या महिल्या नेत्यांनी आपले अनुभव यावेळी व्यक्त केले. माजी मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, दिवसभर पदयात्रेत चालल्यानंतरही थकवा जाणवत नाही.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील या पदयात्रेतून एक सकारात्मक उर्जा निर्माण होत आहे, ही सकारात्मक उर्जा माणसांना जोडण्याचे तसेच देशाला जोडण्याचे काम करत आहे.
प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या की, ही पदयात्रा मानवतेची यात्रा असून महिलांचा सहभाग आनंद देणारा आहे. पदयात्रेत महिला मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.
काँग्रेस पक्ष हा महिलांचे हित जोपासणारा पक्ष आहे.
आ. डॉ. प्रज्ञा सातव म्हणाल्या की, भारत जोडो यात्रेत महिलांचा सहभाग मोठा आहे. महागाईचा मुद्दा हा महिलांचा अत्यंत जवळचा मुद्दा आहे. ४०० रुपयाचा स्वयंपाकाचा गॅस आज १२०० रुपये झाला आहे पण त्याविरोधात भाजपाचा एकही नेता तोंड उघडत नाही. काँग्रेस सरकार असताना ४०० रुपयांचा गॅस त्यांना महाग वाटत असे व मोदी, स्मृती इराणींसह अनेक नेते रस्त्यावर उतरून आवाज उठवत होते पण आज गॅस १२०० रुपयांचा झाला तरी मोदींना महिलांना होणारा त्रास दिसत नाही.
भारत जोडो यात्रेत महिलांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडले जात आहेत, त्याला वाचा फोडली जात आहे.या पत्रकार परिषदेला माजी मंत्री यशोमती ठाकूर, प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, आ. डॉ. प्रज्ञा सातव, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाच्या महिमा सिंह या उपस्थित होते.
ML/KA/SL
15 Nov. 2022