गुगली ट्रम्प यांची, विकेट मोदी सरकारची

मुंबई, दि. ३– अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चा फलदायी, सकारात्मक, समाधान कारक यासारखी विशेषण लावत झाल्याचे परराष्ट्र खात्यापासून ते भारतातील मोदी सरकार धार्जिण्या प्रसार माध्यमातून सर्वत्र सांगितले जात होते. त्यातच “मोदी, माय फ्रेंड, इज ए ग्रेट नेगोशिएटर” (मोदी व्यवहारिक वाटाघाटीत तरबेज आहेत) असे म्हणणारा ट्रम्प यांचा व्हिडियो सोशल मीडियावर गेले काही दिवस झळकत होता पण घडले मात्र उलटे. ट्रम्प यांचे ते वक्तव्य गुगलीच ठरले, असे काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी म्हटले आहे.
भारतातून अमेरिकेत निर्यात केल्या जाणाऱ्या मालावर ट्रम्प यांनी तब्ब्ल २७% करभार जाहीर केला आहे. एवढेच नव्हे तर ट्रम्प यांनी भारताला जगातील इतर १३८ देशांच्या यादीत बसविले. भारतासाठी हा केवळ धक्काच नव्हे तर अपमानही आहे. भारतातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या मालाची सरासरी उलाढाल हि कमी जास्त पद्धतीत अंदाजे ११ हजार कोटींच्या (९५ बिलियन डॉलर्स) पुढे आहे. याउलट अमेरिकेतून भारतात आयात केल्या जाणाऱ्या मालाची उलाढाल ही ४ हजार कोटींच्या जवळपास गेली आहे. इंजिनियरिंग क्षेत्रातील भारताची निर्यात अंदाजे ७ हजार कोटी, दागिने ५ हजार कोटी, पेट्रोलियम ५ हजार कोटी, यासारख्या असंख्य क्षेत्रातील निर्यातीवर विपरीत परिणाम होणार आहे. या आकडेवारीवरून नुकसान भारताचेच अधिक आहे हे स्पष्ट होत आहे.
ट्रम्प यांच्या या निर्णयाचे प्रामुख्याने भारताच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहेत अशी भीती विविध अर्थतज्ञ व्यक्त करीत आहेत. पण विशेष करून आयटी क्षेत्रातील सुशिक्षित बेकारी तर वाहन क्षेत्रातील कामगार वर्गात बेकारी वाढणार आहे. मोदी सरकारला ट्रम्प यांच्यावर इतका भरवसा होता कि या प्रश्नावर विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन चर्चा करण्याचे तारतम्य सुद्धा मोदी सरकारने दाखविले नाही असे गाडगीळ यांनी म्हंटले आहे.
ट्रम्प यांच्यावर विश्वास टाकत गाफील राहिलेल्या मोदी सरकारची, ट्रम्प यांनी गुगली टाकत जणू विकेटच घेतली आहे अशी खरमरीत टीका अनंत गाडगीळ यांनी केली आहे.