वाहतुक कोंडीवर उपाययोजना करा अन्यथा, संयमाचा बांध फुटेल

ठाणे, दि १५
ठाणे शहरातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त असताना वाहतुक विभाग मात्र नवनविन तंत्रज्ञानाने दंड आकारत आहे. या दुहेरी कोंडीच्या मनस्तापाला सोमवारी (दि.१५ सप्टे.) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाचा फोडली. मनसे ठाणे – पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली तीनहात नाका जंक्शनवर जोरदार आंदोलन छेडण्यात आले. वाहन चालकांवर दंड लावणाऱ्या वाहतूक विभागाने आधी वाहतुक कोंडीवर उपाययोजना करावी. अन्यथा, वाहनचालकांच्या संयमाचा बांध फुटेल. असा इशारा देत मनसेने वाहतुक उपायुक्त पंकज शिरसाट यांना निवेदन सादर केले. यावेळी मनसे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे, मनविसेचे संदीप पाचंगे, पुष्कर विचारे आदिसह शेकडो महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली असून, रोजच्या प्रवासात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच्या निषेधार्थ मनसेने सोमवारी तीनहात नाका जंक्शनवर वाहतुक विभागाच्या कार्यालयासमोर फलक झळकवत आंदोलन केले. यावेळी अविनाश जाधव यांनी वाहतूक विभागाचे वाभाडे काढले. वाहतुक पोलिसांकडून कोंडी कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना होत नाही फक्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. तेव्हा, नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळावा यासाठी पोलिस प्रशासनाने नवे तंत्रज्ञान वापरून उपाय शोधले पाहिजेत. तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तात्काळ पावले उचलली पाहिजेत.” नवनविन तंत्रज्ञानाने केवळ दंडात्मक कारवाई करून कोंडी कमी होत नाही, तर त्यासाठी शास्त्रोक्त व नियोजनबद्ध पद्धतीने वाहतूक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. अशी सुचना करून मनसेने प्रशासनाला जाब विचारला. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा करावी, नागरिकांच्या सोईसाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि वाहनचालकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे त्वरित निराकरण करावे. वाहतुक शाखेने कार्यपद्धतीत योग्य तो बदल करून वाहतुक कोंडीवर उपाययोजना करावी. मगच चालकांना नियम पालनासाठी वेठीस धरावे. अन्यथा, एक दिवस वाहनचालकांच्या संयमाचा बांध फुटेल. असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.AG/ML/MS