खाजगीकरणा विरोधात म.न.पा. कामगार आंदोलनास उद्धव ठाकरेंचा पाठींबा !

मुंबई प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील २२ विभागामध्ये एरीया बेस्ड नावाखाली सध्या कार्यरत असलेल्या कायम आणि कंत्राटी कामगार अशा १५ हजार कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात येत असल्यामुळे म.न.पा. मध्ये कार्यरत असलेल्या सर्व संघटना एकत्र येऊन संघर्ष समितीमार्फत तीव्र आंदोलन करणार आहेत. या संदर्भात अनेक राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निवेदन देण्यात आलेली आहेत. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची नुकतीच मातोश्री बंगल्यावर जाऊन संघर्ष समितीच्या प्रमुख नेत्यांनी भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी याबाबत स्वतः लक्ष घालून विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याचे मान्य केले. त्यावेळी म्युनिसिपल मजदूर युनियनच्यावतीने अध्यक्ष अशोक जाधव, निमंत्रक वामन कविस्कर, यशवंतराव देसाई, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्यावतीने बाबा कदम, सत्यवान जावकर, संजय कांबळे-बापेरकर, मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्यावतीने श्री. शेषराव राठोड, संजीवन पवार, दि म्युनिसिपल युनियनच्यावतीने श्री. रमाकांत बने रंगनाथ सातवसे, म्युनिसिपल मजदूर संघाच्यावतीने प्रकाश जाधव, संजय कापसे आणि कचरा वाहतुक श्रमिक संघाच्यावतीने अॅड्. दिपक भालेराव, मिलिंद रानडे आणि इतर कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
सुमारे १५ हजार कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ नये म्हणून प्रत्येक विभागातील कामगारांनी विभागवार निदर्शन करीत आहेत. जर का म.न.पा. प्रशासनाने आणत असलेले टेंडर रद्द केले नाही तर तीव्र आंदोलन करणार आहेत, त्याचा भाग म्हणुन कृती समितीमार्फत मंगळवार दि. १५ जुलै २०२५ रोजी संप करावा की करू नये यासाठी मतदान घेणार आहे. त्यानंतर बुधवार दि. १६ जुलै २०२५ रोजी विधानसभेवर कामगार आपल्या मागण्यांसाठी प्रचंड मोर्चा घेऊन जाणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटून सकारात्मक मार्ग काढावा अशी मागणी संघर्ष समितीच्या सर्व नेत्यांच्यावतीने करणार आहे. जर का सकारात्मक तोडगा निघाला नाही व म.न.पा. प्रशासनाने काढलेले टेंडर रद्द केले नाही तर गुरूवार दि. १७ जुलै २०२५ पासून कामगार संघटनात्मक कृती करतील, अशी माहिती संघर्ष समितीचे निमंत्रक श्री. वामन कविस्कर यांनी दिली आहे. ML/ML/MS