ऑनलाइन नोंदणी केल्यास ‘एसएमएस’ किंवा ‘ई मेल’द्वारे मालमत्ताकर देयके मिळणार

मुंबई, दि. 8
मुंबई महानगरातील मालमत्ताधारकांना मालमत्ताकर संबंधित विविध सेवासुविधांचा ऑनलाईन पद्धतीने लाभ घेता यावा तसेच कर भरणा प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने मालमत्ताकर संदर्भात ऑनलाईन सेवा उपलब्ध केली आहे. या ऑनलाइन सेवेचा लाभ घेण्यासाठी मुंबईतील मालमत्ताधारकांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/#/loginया संकेतस्थळावर जाऊन ‘आपले ग्राहक ओळखा’ (केवायसी) ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) श्री. विश्वास शंकरवार आणि करनिर्धारक व संकलक श्री. गजानन बेल्लाळे यांच्या देखरेखीत करनिर्धारण व संकलन खात्याच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, मालमत्ताकर संदर्भात ऑनलाइन सेवाही पुरविल्या जात आहेत.
मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या महसुलाचा प्रमुख स्त्रोत आहे. करनिर्धारण व संकलन खात्याकडून बृहन्मुंबई क्षेत्रातील मालमत्तांचे करनिर्धारण करून मालमत्तांना दरवर्षी कर देयके निर्गमित करून कर संकलन केले जाते. आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता १० लाखाहून अधिक मालमत्ताधारकांना मालमत्ताकर देयके निर्गमित केली जाणार आहेत. अद्यापपर्यंत अंदाजे ४ लाख मालमत्ताधारकांकडून मालमत्तांची ऑनलाईन पद्धतीने ‘केवायसी’ अद्ययावतीकरण (KYC update) करण्यात आले आहे. त्यामुळे त्या मालमत्ताधारकांना मालमत्ताकर संदर्भात ‘एसएमएस’ / ‘ई मेल’द्वारे वेळोवेळी सूचना प्राप्त होत आहेत.
उर्वरित मालमत्ताधारकांनीदेखील मालमत्ताकर संदर्भातील ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/#/loginया संकेतस्थळावर जाऊन ‘आपले ग्राहक ओळखा’ अर्थात ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना सदर संकेतस्थळावर जाऊन मालमत्ता लेखा क्रमांक, नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, ई मेल आयडी, प्रवर्ग (उदा. मालक/सचिव/अध्यक्ष/लेखापाल/इतर) आदी माहिती भरावी लागेल. तसेच समभाग (शेअर) प्रमाणपत्र; गॅस देयक / वीज देयक / दूरध्वनी देयक; गृहनिर्माण संस्थेच्या शीर्षपत्रावरील (लेटरहेड) अधिकृत पत्र ही कागदपत्रे ‘स्कॅन’ करुन अपलोड करावी लागतील.
‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मालमत्ताधारकांना देयकांचा ऑनलाइन भरणा करणे; थकबाकी नसल्यास ‘ना हरकत प्रमाणपत्र’ / देय रकमेचा भरणा केल्याचे प्रमाणपत्र पाहणे; पक्षकाराच्या किंवा मालमत्ताधारकाच्या नावात बदल करण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरणे; अधिदान केलेल्या देयकांचा अहवाल पाहणे; मालमत्तेची खतावणी (Property Ledger) पाहणे; मालमत्तेचे परिशिष्ट (Annexure Report) पाहणे; मालमत्ता कर देयकनिहाय थकबाकी अहवाल पाहणे; अधिदानाची पोचपावती पाहणे आदी सुविधांचा ऑनलाइन पद्धतीने लाभ घेता येईल. त्यासमवेत, प्रशासनाकडून मालमत्ता कराशी संबंधित जारी केलेल्या सूचना देखील ‘एसएमएस’ किंवा ‘ई मेल’च्या माध्यमातून प्राप्त करता येतील. मालमत्ता कर देयके तयार होताच त्याची ‘पीडीएफ’ स्वरूपातील सॉफ्ट कॉपी करदात्यांना ‘ई मेल’द्वारे प्राप्त करता येतील.
KK/MS