आमदार अपात्रता सुनावणी आता पुढील महिन्यात

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सत्ता परिवर्तन झाल्यानंतर सुरू असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आजपासून पुन्हा सुरू झाली असून त्याची पुढील सुनावणी पुढच्या महिन्यात तेरा तारखेला होणार आहे.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर त्यावेळी पक्ष प्रमुख असणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी नेमलेल्या पक्ष प्रतोदाचा पक्षादेश अर्थात व्हीप नाकारल्याने एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी याचिकेद्वारे विधानसभा अध्यक्षा समोर करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने याबाबत दाखल झालेल्या अनेक याचिकांवर सुनावणी घेऊन निकाल देताना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी करण्याचे अधिकार अध्यक्षांचे असल्याचे सांगत त्यांनी ठराविक कालावधीत सुनावणी पूर्ण करण्यास सांगितले होते.
या गोष्टीला चार महिने होऊन गेले असून अध्यक्ष राहुल नार्वेकर हे याबाबत टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत ठाकरे गटाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. न्यायालयाने अध्यक्षांवर ताशेरे ओढत सुनावणी कालबद्ध पद्धतीने घेत त्याचे वेळा पत्रक सादर करण्यास सांगितले आहे.
यानुसार आजपासून पुन्हा सुनावणी सुरू झाली असून आज दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपापली बाजू अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर मांडली. सर्व याचिकांवरील सुनावणी वेळ न घालवता एकत्रित पणे घ्यावी अशी मागणी ठाकरे गटाने केली तर त्याला शिंदे गटाने विरोध केला. याबाबतची पुढील सुनावणी आता तेरा ऑक्टोबर रोजी होईल.
ML/KA/SL
25 Sept. 2023