मिशन आदित्य एल 1 चे प्रक्षेपण यशस्वी
श्रीहरीकोटा, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताची सूर्य मोहीम आदित्य एल-1 (Aditya L1) यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी सतीश धवन अवकाश केंद्रातून आदित्य एल1 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. सतीश धवन अवकाश केंद्रात मोठ्या प्रमाणात लोकांची देखील गर्दी जमली होती. यावेळी ‘भारत माता की जय’ या घोषणा देखील देण्यात आल्या. त्यानंतर संपूर्ण देशभरातून इस्रोच्या या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे.भारताच्या पहिल्या सौर मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी इस्रोचे (ISRO) शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, चांद्रयान-3 च्या यशानंतर भारताने पुन्हा एकदा आपला अंतराळातील प्रवास सुरु केला आहे.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी आमचे अथक प्रयत्न हे सुरुच राहतील. चांद्रयानाच्या नंतर भारताने आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. यासाठी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील इस्रोचे अभिनंदन केले आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, आपल्या शास्त्रज्ञांनी वेळोवेळी आपले सामर्थ्य सिद्ध केलं आहे. भारताचे पहिले सौर मिशन आदित्य L1 चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल देशाला अभिमान आणि आनंद आहे. इस्रोच्या संपूर्ण टीमचे या महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी अभिनंदन. अमृत महोत्सवीवर्षात आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या दृष्टीने अंतराळ क्षेत्रातील हे महत्त्वाचं पाऊल आहे.
या मिशनमध्ये हवामानाची गतीशीलता, सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम आणि ओझोन थर यांचा अभ्यास केला जाणार आहे. सूर्याचा अभ्यास करून हवामानाचा अंदाजही अधिक अचूक होईल, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. यामुळे अशी यंत्रणा तयार होण्यास मदत होईल, ज्याद्वारे वादळाची माहिती तात्काळ मिळेल आणि त्याची सुचना देता येईल.
या मिशनसाठी ४०० कोटींमध्ये सौर वेधशाळा तयार करण्यात आली आहे. हा उपग्रह सुर्यावरील उष्णता लहरी आणि सूर्यावर येणाऱ्या वादळांवर नजर ठेवणार आहे.याबाबत इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले की ‘आदित्य एल-१’सूर्यावर सतत लक्ष ठेवणार आहे. हा उपग्रह आपल्याला सूर्याच्या विद्युत चुंबकीय प्रभावांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याची सुचना आधीचं देईल. जर वेळेच्या आधी सुचना मिळाली तर उपग्रह, बाकीचे विद्युत साधनांना नुकसान होण्यापासून वाचवले जाऊ शकते.अंतराळात भारताचे पन्नासपेक्षा जास्त उपग्रह आहेत. ज्याची किंमत ५०,००० कोटींपेक्षा जास्त आहे, आदित्य एल-१’ हे मिशन या उपग्रहांना वाचवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
ML/KA/SL
2 Sept. 2023