मीरा भाईंदरमध्ये मूर्ती विसर्जनावरून तणाव, नागरिकांचे आंदोलन
ठाणे दि २८– जिल्ह्यातील भाईंदर परिसरात काही ठिकाणी मातीच्या मूर्तीदेखील नैसर्गिक तलावात विसर्जन करू देण्यास महानगरपालिकेने मनाई केल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले त्यांनी मूर्ती रस्त्यावर ठेऊन आंदोलन सुरू केले होते. महानगर पालिका हद्दीतील मोर्वा, राई आणि मुर्धें या गावातील नागरिकांनी रस्त्यावर गणपती ठेऊन आंदोलन सुरू केले होते.
पारंपरिक पद्धतीने आम्ही आमच्या गावात असणाऱ्या तलावात विसर्जन करतो मात्र आता मनाई केली जात आहे, याशिवाय शाडूच्या मूर्ती देखील या तलावात विसर्जन करू दिल्या जात नाहीत असा ग्रामस्थांचा आरोप होता. या सगळ्याच्या निषेधार्थ त्यांनी रस्त्यावर मूर्ती ठेऊन आंदोलन पुकारले. तिन्ही गावातील तलावांवर पोलिस बंदोबस्त असून त्याठिकाणी विसर्जन करू दिले जात नव्हते, महानगरपालिकेच्या वतीने यावर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा ग्रामस्थानी दिला होता, साधारण दोन तासांपासून आंदोलन सुरू राहिले, त्यानंतरही महापालिका आणि पोलिस यांनी कोणताही तोडगा काढला नाही, अथवा त्यांचे कोणतेही वरिष्ठ अधिकारी याठिकाणी फिरकले देखील नाहीत.
यानंतर तिन्ही गावातील नागरिकांनी गावातील तलावाच्या दरवाजाला लावलेले कुलूप तोडून गावातील तलावांवर महानगर पालिका आणि पोलीस यांना न जुमानता सरसकट सर्व मूर्तींचे विसर्जन करण्यास ग्रामस्थानी सुरुवात केली. यावेळी पालिका आणि पोलिस प्रशासन हतबल झालेले पहायला मिळाले.ML/ML/MS