वर्ल्ड वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने जिंकले रौप्य पदक
भारतीय वेटलिफ्टिंगचा चेहरा बनलेली मीराबाई चानूने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवत नॉर्वेमधील फोर्डे येथे पार पडलेल्या वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये रौप्य पदक जिंकले आहे. 48 किलो वजन गटात स्पर्धा करताना तिने स्नॅचमध्ये 84 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो असे एकूण 199 किलो वजन उचलले आणि दुसरे स्थान मिळवले.
उत्तर कोरियाच्या री सांग गुम हिने 213 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले, तर थायलंडच्या थान्याथन सुक्चारोएन हिने 198 किलो वजन उचलून कांस्य पदक मिळवले. चानूने क्लीन अँड जर्कमध्ये दमदार कामगिरी करत थान्याथनला मागे टाकले आणि अवघ्या 1 किलोच्या फरकाने रौप्य पदक आपल्या नावावर केले.
हे मीराबाई चानूचे जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेतील तिसरे पदक आहे. याआधी तिने 2017 मध्ये अनाहाईम येथे सुवर्ण आणि 2022 मध्ये बोगोटा येथे रौप्य पदक जिंकले होते. अलीकडेच अहमदाबादमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये तिने सुवर्ण पदक जिंकत पुनरागमनाची झलक दाखवली होती.
या ऐतिहासिक यशानंतर मीराबाईने आपल्या प्रशिक्षक विजय शर्मा यांचे आभार मानले. गेल्या काही वर्षांत झालेल्या दुखापतींमुळे तिच्या कारकिर्दीसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते, मात्र तिच्या जिद्दीने आणि मेहनतीने तिने पुन्हा एकदा भारताचा झेंडा जागतिक स्तरावर उंचावला आहे. तिच्या या कामगिरीमुळे पॅरिस ऑलिंपिक 2028 साठी भारताच्या आशा अधिक बळकट झाल्या आहेत.
SL/ML/SL
3 Oct. 2025