या देशांतून 2024 पर्यंत भारतात आलेल्या अल्पसंख्यांकांना विनाकागदपत्र राहण्याची मुभा

नवी दिल्ली, दि. ३ : पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश येथून धार्मिक छळ टाळण्यासाठी भारतात आलेल्या अल्पसंख्याक समुदायांना भारतात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले की, 31 डिसेंबर 2024 पर्यंत भारतात दाखल झालेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन नागरिकांना वैध पासपोर्ट किंवा प्रवासी कागदपत्रांशिवाय देशात राहण्याची मुभा मिळेल.
गेल्या वर्षी लागू झालेल्या नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्यानुसार (CAA), 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्या पीडित अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. परंतु 2014 नंतर भारतात आलेल्या अनेकांना आपल्या भविष्यासंदर्भात संभ्रम होता. नुकत्याच लागू झालेल्या आव्रजन आणि विदेशी (नागरिक) अधिनियम 2025 अंतर्गत जारी आदेशामुळे या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आदेशामुळे विशेषतः पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंना थेट फायदा होणार आहे.
गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, “अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि पाकिस्तान येथील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन हे अल्पसंख्याक समुदाय धार्मिक छळामुळे किंवा त्याच्या भीतीने भारतात आश्रयासाठी आले असल्यास, आणि त्यांनी 31 डिसेंबर 2024 पर्यंत वैध कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश केला असेल, तरी त्यांना वैध पासपोर्ट आणि व्हिसाची सक्ती राहणार नाही.”