दापोलीसाठी राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून 150 कोटींची भरीव तरतूद
 
					
    मुंबई, दि. १६ – दापोली मतदारसंघात राज्यमंत्री योगेश कदम यांनी आतापर्यंत सुमारे दीडशे कोटी रुपयांचा विकासनिधी उपलब्ध करून देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या निधीच्या माध्यमातून प्रशासनिक सुविधा, पर्यटन विकास, पाटबंधारे प्रकल्प आणि तांडा वस्ती सुधार योजना अशा विविध क्षेत्रांत भरीव कामे हाती घेण्यात आली आहेत.
दापोली येथे उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालयासाठी नव्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी 30.47 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंडणगड येथेही तहसील कार्यालयाच्या इमारतीसाठी 23.20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टीने, कोकण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत दापोली तालुक्यातील करदे समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्यीकरण करण्यासाठी 14.20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
जलसिंचनाच्या गरजांसाठी, मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरण लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या दुरुस्तीच्या कामासाठी 60.41 कोटी रुपयांचा निधी मिळवण्यात आला आहे. तसेच, मंडणगड येथील बाणकोट किल्ल्यापर्यंत 60.5 किलोमीटर लांबीचा रोपवे उभारण्यात येणार असून, हा प्रकल्प पर्यटनवाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याशिवाय, दापोली येथील केशवराज विष्णू मंदिर परिसरात 1.2 किलोमीटर लांबीच्या रोपवेचे काम अंतिम टप्प्यात असून, ते लवकरच पूर्ण होणार आहे.
इतिहास आणि सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने गोवा किल्ला, भुईकोट किल्ला, तसेच सुवर्णदुर्ग किल्ला (हर्णे, दापोली) यांचा विकास प्रस्तावित असून, यामुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.
वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजने अंतर्गत सहा तांड्यांसाठी 1 कोटी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यामुळे राज्यातील दापोली मतदार संघातील विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गात अनेक जाती, जमातीचे लोक अशा वस्त्यांवर राहतात त्यावस्तींच्या विकासालाही हातभार लागणार आहे. या सर्व प्रकल्पांद्वारे दापोली मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी एक ठोस आणि दिशा-दर्शक पाऊल उचलण्यात आले आहे.
 
                             
                                     
                                    