“मी मंत्री, आमदार नंतर… मराठी आधी!” – मंत्री सरनाईक यांची भूमिका !

 “मी मंत्री, आमदार नंतर… मराठी आधी!” – मंत्री सरनाईक यांची भूमिका !

मीरा-भाईंदर दि ८ :– आज मीरा-भाईंदर शहरात मराठी एकीकरण समितीच्या वतीने मीरा रोड येथे मराठी अस्मिता, स्थानिक भाषिकांचे अधिकार आणि न्याय मागण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्या विनंतीवरून महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक सहभागी झाले होते.

परंतु महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री असताना ही उबाठा आणि मनसेचे कार्यकर्ता तेथे विरोधात घोषणाबाजी देणार हे माहित असून देखील मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी अपमान सहन करत मोर्चात आपला सहभाग दर्शविला. मोर्चात येण्यापूर्वी काशिगाव पोलीस ठाण्यात अटक करण्यात आलेले मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांची मंत्री सरनाईक यांनी स्वतः तातडीने सुटका केली. त्यानंतर नवघर पोलीस ठाण्यात जाऊन मनसे व एकीकरण समितीच्या इतर कार्यकर्त्यांची ही सुटका केली आणि त्यानंतर मंत्री सरनाईक हे मोर्चात सहभागी झाले.

काल रात्री उशिरा पोलिसांकडून करण्यात आलेल्या गैरवर्तवणुकीबाबत मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोलिसांकडून करण्यात आलेल्या काही मनसे नेते आणि आणि पदाधिकाऱ्यांच्या चुकीच्या अटकेबाबत सविस्तर चर्चा केली. त्याचबरोबर व्यापार्यांकडून काढण्यात आलेला मोर्चा जसा शांतप्रकारे पार पडला तसेच आजचा मोर्चा देखील शांतप्रकारे पार पडणार होता. परंतु हा मोर्चा होण्याआधीच पोलिसांकडून गुंडगिरी करत मनसे नेते यांना अटक करण्यात आली.

त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळले आणि पोलिसांकडून हे प्रकरण योग्यरीत्या हाताळले गेले नसल्याकारणामुळे हि परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे तातडीने त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी. अशी मागणी मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आणि यावर मुख्यमंत्री महोदयांकडूनही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलेला असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

या संपूर्ण घटनेवर मंत्री सरनाईक स्पष्ट भूमिका मांडत म्हणाले की, “जेव्हा जेव्हा मराठी माणसावर अन्याय होईल, तेव्हा मी पद विसरून मराठी माणसाच्या बाजूने उभा राहीन. मी या मोर्चात कोणत्याही राजकीय हेतूने नाही, तर मराठी माणसाच्या अस्मितेसाठी सहभागी झालो. माझ्यावर घोषणा करून काहीजण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत होते, पण मी माझी जबाबदारी पार पाडली. मराठी माणसासाठी, त्याच्या हक्कासाठी आणि शहरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी मी मराठी माणूस म्हणून ही माझी नैतिक आणि सामाजिक जबाबदारी असण्याचे समजतो.

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. मात्र, मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर कुणीही अन्याय करू शकत नाही, हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. जिथे मनसे-उबाठाचे कार्यकर्ते असतील तिथे माझ्या नावाचे गुणगान गायले जातील अशी अपेक्षा ठेवणं मुळात चुकीचं आहे. मी मराठी एकीकरण समितीला शब्द दिलं होता कि, मी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी मिरा-भाईंदरमध्ये आयोजित मोर्चात सामील होईल आणि तो दिलेला शब्द मी पूर्ण केला आहे. जेव्हा – जेव्हा प्रश्न मिरा-भाईंदरमधील मराठी माणसाचा असेल तेव्हा तेव्हा मी मराठी माणूस म्हणून त्यांच्या सोबत उभा राहीन. मी मंत्री, आमदार नंतर… मराठी आधी” अशी स्पष्ट भूमिका मंत्री सरनाईक यांनी मांडली.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *