पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण – शिक्षणमंत्र्याची घोषणा

नाशिक, दि. ३ : नाशिकमध्ये झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शालेय विद्यार्थ्यांना पहिलीपासून सैनिकी शिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा केली. शिक्षणमंत्री म्हणाले, ‘प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचे धडे दिले जातील’. माजी सैनिक, क्रिडा शिक्षक, एनसीसी व स्काऊट गाईडचे शिक्षक विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचे धडे देतील. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, माजी सैनिक कल्याणमंत्री शंभुराज देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर केला जाईल.”
भुसे पुढे म्हणाले की, ‘जिल्हा परिषदेच्या ४८ शिक्षकांना नुकतेच सिंगापूर येथे अभ्यास दौऱ्यासाठी पाठविले होते. तेथील शिक्षण व्यवस्थेमध्ये ‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना आढळून आल्याचे या शिक्षकांनी सांगितले. महाराष्ट्रही शिक्षणात आमूलाग्र बदल करीत असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून ते दिसून येईल. त्यानुसार ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी पहिलीपासून सैनिकी शिक्षणाचे प्राथमिक स्तरावरील शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.