लीलावती परिसरातील वाहतूक कोंडी सोडवावी, आमदार मिलिंद नार्वेकर
मुंबई, दि ९
वांद्रे व खार पश्चिम भागातील होत असलेली मोठी वाहतूक कोंडी सोडवावी याबाबत आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विशेष सूचनेद्वारे सभापतींकडे हिवाळी अधिवेशनामध्ये सूचना मांडली. वांद्रे व खार पश्चिम भागातील बहुतांश गल्ल्यामधील टुमदार बंगले, दुमजली घरे आणि बैठ्या चाळी हळूहळू इतिहास जमा होत आहेत. त्याजागी मोठ-मोठे टॉवर उभे राहत आहेत. त्यामुळे या भागातील लोकसंख्येत वाढ होत असून रस्त्यावरील वर्दळ देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लीलावती रुग्णालय ते खारदांडा या मार्गावर अरुंद रस्ते, रस्त्यावरच फेरीवाल्यांनी केलेले अतिक्रमण, वाढती वाहनसंख्या आणि त्यांच्या पार्किंगचा प्रश्न यांमुळे नेहमीच प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. त्याचा मोठा फटका लीलावती रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे. वांद्रे पश्चिमेकडील हिल रोड, लिंकिंग रोड, कार्टर रोड इत्यादि रस्ते एस. व्ही. रोडला येऊन मिळतात. बॅन्डस्टँडकडे जाणाऱ्या या मार्गावर कायमच वाहनांची प्रचंड वर्दळ असते. परंतु रस्ता अरुंद असल्याने गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग लक्षणीयरित्या मंदावतो. अशातच वाहतूककोंडीत अडकलेल्या वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर ध्वनिप्रदूषण होत आहे. या नित्याच्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. यास्तव या परिसरात नेहमीच होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना हाती घ्याव्यात, ही या विशेष उल्लेख सुचनेद्वारे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी शासनास केली.KK/ML/MS