मुंबईत मिफ्फ सुरू, सुब्बिया नल्लामुथू यांना जीवनगौरव पुरस्कार
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) मध्ये प्रसिद्ध वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बिया नल्लामुथू यांना बहुप्रतिष्ठित व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज केली.
“यावर्षीच्या महोत्सवात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकल्याबद्दल मी नल्लामुथू यांचे अभिनंदन करतो”, असे मुरुगन यांनी एनएफडीसी संकुलात माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. वन्यजीव चित्रपट निर्मिती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार सुब्बिया नल्लामुथु यांना मिफ्फ मध्ये प्रदान केला जाईल.
सुब्बिया नल्लामुथु यांनी वन्यजीव चलचित्रनिर्माणात केलेल्या अपवादात्मक कामगिरीमुळे त्यांना जगभरात प्रसिद्धी लाभली. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था – ‘एफ. टी. आय. आय.’चे माजी विद्यार्थी असलेल्या सुब्बिया यांचा ‘लिवींग ऑन द एज’ हा चित्रपट भारतातील पर्यावरणविषयक चित्रपटांच्या मालिकेतील पांडा पुरस्कार विजेता चित्रपट ठरला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था- ‘इस्रो’मध्ये अत्यंत वेगवान कॅमेरामन म्हणून त्यांची कारकीर्द नावाजलेली आहे.
वाघाची भारतीय प्रजाती असलेल्या ‘रॉयल बेंगॉल टायगर’प्रति त्यांना असलेल्या उत्कट प्रेमाची अभिव्यक्ती ‘नॅशनल जिओग्राफिक’ आणि ‘बीबीसी’ वाहिन्यांसाठी त्यांनी तयार केलेल्या व्याघ्रकेंद्रित पाच माहितीपटांमधून पाहायला मिळते. ‘टायगर डायनेस्टी’ (2012-13), ‘टायगर क्वीन’ (2010) आणि ‘द वर्ल्ड्स मोस्ट फेमस टायगर’ (2017) या चित्रपटांचा त्यांच्या वन्यजीवविषयक चित्रपटांमध्ये समावेश आहे. पर्यावरण तसेच माणूस व परिसंस्था यांच्यातील परस्परसंबंधांचे चित्रण करणारे अनेक माहितीपट त्यांनी तयार केले आहेत. त्यामध्ये ‘बीबीसी वर्ल्ड’साठी तयार केलेल्या ‘अर्थ फाईल’ (2000) आणि ‘अॅनिमल प्लॅनेट’साठी केलेल्या ‘द वर्ल्ड गॉन वाईल्ड’ (2001) या माहितीपटांचा समावेश आहे. भारतात 4K रिझोल्युशन तंत्रज्ञानाचा वापर वन्यजीव चित्रीकरणासाठी करणाऱ्या पहिल्या चित्रपटकारांपैकी एक हा त्यांच्या शिरपेचातील मानाचा आणखी एक तुरा आहे.
सुब्बिया नल्लामुथु यांना पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह इतर विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. ‘जॅक्सन होल वन्यजीव चित्रपट महोत्सवा’च्या परीक्षक मंडळाचे ते नियमित सदस्य असून ‘भारतीय पॅनोरामा चित्रपट महोत्सवा’ (2021) च्या परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे.
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराविषयी
प्रतिष्ठेचा मानला गेलेला डॉ. व्ही. शातांराम जीवनगौरव पुरस्कार मिफ्फच्या प्रत्येक आवृत्तीत प्रदान केला जातो. माहितीपट व संबंधित चळवळीत मोलाचे योगदान दिलेल्या चित्रपटकाराची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. दहा लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि गौरवपर उल्लेखाचे प्रमाणपत्र असे व्ही. शांताराम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वीच्या या पुरस्कार विजेत्यांमध्ये श्याम बेनेगल, विजया मुळ्ये यांच्यासह इतर नामांकित चित्रपटकारांचा समावेश आहे.
ML/ML/SL
15 June 2024