मुंबई मेट्रो २ए व ७ या मार्गिकांना मिळाले कार्बन-न्यूट्रल प्रमाणपत्र
कार्बन न्यूट्रॅलिटी आणि कार्बन क्रेडिट्स

मुंबई दि ४ :–
जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) पर्यावरण शाश्वततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. एका विशेष सोहळ्यात मुंबई मेट्रो २ए आणि ७ या मार्गिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्बन न्यूट्रॅलिटी आणि कार्बन क्रेडिट प्रमाणपत्रे औपचारिकरित्या प्रदान करण्यात आली. या सोहळ्यासाठी मुख्य सचिव, सुजाता सौनिक (भा.प्र.से.), एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.)आणि महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमएमओसीएल) व्यवस्थापकीय संचालक, श्रीमती रुबल अगरवाल (भा.प्र.से.) हे मान्यवर उपस्थित होते.
या ऐतिहासिक कामगिरीतून मेट्रो २ए (दहिसर पूर्व ते डी. एन. नगर) आणि ७ (दहिसर पूर्व ते गुंदवली) या मार्गिका कार्बन-न्यूट्रल कॉरिडॉर असल्याचे अधोरेखित होते आणि हरित व शाश्वत नागरी वाहतुकीकडे वाटचाल करण्याच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांना यामुळे अधिक चालना मिळते.
जागतिक मानकांद्वारे मान्यता प्राप्त केलेली कामगिरी
एमएमएमओसीएलने या मार्गिकांची कार्बन न्यूट्रॅलिटी तपासण्यासाठी तृतीयपक्षीय लेखापरीक्षण सुरू केले होते. या लेखापरीक्षणामध्ये या मार्गिका पीएएस २०६०:२०१४ या आंतरराष्ट्रीय मानकानुसार कार्बन न्यूट्रल असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय, ‘मेट्रो २ए मार्गिका आणि मेट्रो ७ मार्गिकांसाठी वाहतूक पद्धतीतील परिवर्तन’ (मोडल शिफ्ट फॉर लाइन्स २ए अँड ७’) या प्रकल्पासाठी जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२४ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी युनिव्हर्सल कार्बन रजिस्ट्रीने (यूसीआर) एमएमएमओसीएलला ८५,८४९ कार्बन ऑफसेट युनिट्स (सीओयू) जारी केली आहेत.
शाश्वततेची व्याप्ती वाढविणे : व्हेरा नोंदणी प्रक्रियेची सुरुवात
पुढील टप्प्यात, एमएमआरडीएने मेट्रो २बी, ४, ४ए, ५, ६, ७ए आणि ९ या बांधकामाधीन मार्गिकांची VEERA कार्बन रजिस्ट्रीत नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही संस्था हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी जागतिक स्तरावरील प्रमुख मानक मानली जाते. हे पाऊल उचलल्याने हवामान बदल लक्षात घेऊन राबवली जाणारी पर्यावरणपूरक शहरी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात मुंबई हे देशातील आघाडीचे शहर म्हणून पुढे येत आहे.
कार्बन न्यूट्रॅलिटी म्हणजे काय? मुंबईच्या दृष्टीने याचे काय महत्त्व आहे?
कार्बन न्यूट्रॅलिटी म्हणजे वातावरणात सोडल्या जाणाऱ्या कार्बनचे प्रमाण व त्याची भरपाई करणाऱ्या प्रकल्पांमधून मिळणारे कार्बन क्रेडिट्स यांच्यात संतुलन साधणे. यामुळे एकूण कार्बन उत्सर्जन ‘शून्य’ होते. मेट्रो सेवा चालवताना होणाऱ्या उत्सर्जनात प्रामुख्याने वीज वापरामुळे होणाऱ्या उत्सर्जनाचा समावेश होतो. हे उत्सर्जन मोजून ते वैध व प्रमाणित कार्बन क्रेडिट प्रकल्पांद्वारे या उत्सर्जनाची भरपाई करता येते. नागरिकांकडून खाजगी वाहनांऐवजी सार्वजनिक मेट्रो सेवा वापरल्यामुळे उत्सर्जनात घट होऊन हे क्रेडिट्स मिळतात.
खाजगी वाहनांऐवजी मेट्रोने प्रवास केल्यामुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणावर फायदा होतो, हा या उपक्रमाचा गाभा आहे. प्रवासाच्या साधनामधील बदलाला चालना देऊन एमएमआरडीएने मुंबई महानगर प्रदेशातील हजारो प्रवाशांच्या कार्बन फूटप्रिंटमध्ये घट साध्य केली आहे. मेट्रो प्रणाली आणि रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांच्या प्रवासाच्या दर किलोमीटरमागील हरितगृह वायू उत्सर्जनाची तुलना केल्यावर तब्बल ८५,८४९ टन कार्बन डायऑक्साइडच्या समतुल्य (TCO₂eq) इतक्या उत्सर्जनात लक्षणीय घट साधण्यात आली आहे.
मुंबईसाठी कार्बन न्यूट्रॅलिटी महत्त्वाची का आहे?
मुंबईसारख्या दाट लोकसंख्येच्या आणि वेगाने वाढणाऱ्या शहरावर कार्बन न्यूट्रॅलिटीचा सखोल परिणाम होतो :
• शहरातील हवेच्या प्रदूषणात घट आणि सार्वजनिक आरोग्यामध्ये सुधारणा
• भारताच्या राष्ट्रीय निर्धारित योगदानाच्या (एनसीडी) उद्दिष्टांनुसार हरितगृह वायू उत्सर्जनात घट.
• जीवाश्म इंधनांवरील अवलंब कमी करून हवामान बदलासंदर्भातील प्रतिकारक्षमता अधिक बळकट होते
जागतिक स्तरावर मान्यता मिळालेल्या पायाभूत सुविधांमुळे, हवामान बदलाशी लढा देण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी जगभरातून मिळणारा निधी आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी गुंतवणूक आकर्षित करता येते.
या कामगिरीबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले :
“कार्बन न्यूट्रॅलिटी हे आता फक्त जागतिक उद्दिष्ट न राहता, स्थानिक पातळीवर पावले उचलण्याची गरज झाली आहे. एमएमआरडीएच्या मेट्रो यंत्रणेच्या माध्यमातून हवामानबदलाबाबत जागरूक असलेली मान्यताप्राप्त वाहतूक व्यवस्था उभारून महाराष्ट्राने या क्षेत्रात देशाचे नेतृत्व केले आहे, याचा अभिमान आहे.”
सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे म्हणाले :
“मुंबईचं भविष्य हरित, आधुनिक आणि सर्वसमावेशक आहे. मेट्रो २ए आणि ७ या मार्गिकांना कार्बन न्यूट्रल प्रमाणपत्र मिळाल्यामुळे आपली पायाभूत व्यवस्था जागतिक मानकांनुसार दर्जेदार आणि पर्यावरणपूरक असल्याचे स्पष्ट होते”
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.) म्हणाले :
“एमएमआरडीएमध्ये शाश्वतता हा अंमलबजाणी केल्यानंतर विचारात घेण्यात येणारा पैलू नाही तर नियोजन व अंमलबजावणी करण्याच्या केंद्रस्थानी हा विचार असतो. कार्बन न्यूट्रल मेट्रो सेवा असो, मल्टीमोडल एकत्रीकरण असो किंवा हरित वाहतूक उपक्रम असो, आम्ही हाती घेतलेली प्रत्येक योजना ही हवामानबदल प्रतिकारक्षम आणि पर्यावरणपूरक मुंबई घडवण्याच्या दृष्टिकोनातून आखलेली आहे. पायाभूत सुविधा प्रगत आणि त्याच वेळी पर्यावरणपूरकही असू शकतात, हेच या मान्यतापत्रातून सिद्ध होते”
एमएमएमओसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल (भा.प्र.से.) म्हणाल्या :
“कार्बन न्यूट्रल मेट्रो मार्गिका प्रत्यक्षात आणल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. मान्यताप्राप्त कार्बन क्रेडिट्स आणि आगामी VEERA was प्रकल्पांच्या माध्यमातून एमएमएमओसीएल सार्वजनिक वाहतूक नेट-झीरोच्या दिशेने नेण्यात सक्रिय भूमिका बजावत आहे.”