Meta ला युरोपियन युनियनकडून १.३ बिलियन युरोंचा दंड
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अन्य देशांमधील फेसबुक-इन्स्टाग्राम यूझर्सचा डेटा अमेरिकेत पाठवल्यामुळे फेसबुकची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटाला युरोपियन युनियनने तब्बल १.३ बिलियन युरो, म्हणजेच सुमारे १० हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबतच डेटा ट्रान्सफर थांबवण्यासाठी मेटाला पाच महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
युरोपियन युनियनमध्ये (EU) असलेल्या देशांतील नागरिकांचा डेटा जर मेटा अमेरिकेत नेत असेल, तर तो अमेरिकी गुप्तचर यंत्रणांच्या हाती देखील लागू शकतो. या भीतीमुळेच यापूर्वीही मेटाला हा डेटा अमेरिकेत न नेण्याची ताकीद देण्यात आली होती. त्यानंतर आता करण्यात आलेल्या कारवाईमुळे मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) चांगलाच अडचणीत सापडला आहे.
सोमवारी (२२ मे) युरोपियन युनियनने मेटाला १०,७६५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. यासोबतच कंपनीला इतर आदेशही दिले. मेटाला अमेरिकेत होणारे डेटा ट्रान्सफर थांबवण्यासाठी पाच महिन्यांची, तर अमेरिकेत डेटा साठवून ठेवणे थांबवण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, हा निर्णय दोषपूर्ण आणि अन्यायकारक असल्याचे मत मेटाकडून व्यक्त करण्यात आले. तात्काळ बंदी घालण्याचा आदेश मागे घेण्याची मागणी आम्ही करणार आहे. या निर्णयामुळे दररोज फेसबुक वापरणाऱ्या लाखो लोकांचे नुकसान होईल, असं मेटाचे ग्लोबल अफेअर्स अध्यक्ष निक क्लेग म्हणाले.
युरोपियन युनियनने यापूर्वी गोपनियतेचा भंग केल्याप्रकरणी अमेझॉन या कंपनीवरही कारवाई केली होती. अमेझॉनला तेव्हा ७४६ मिलियन युरोंचा दंड ठोठावण्यात आला होता. मेटावरील आजच्या कारवाईने हा रेकॉर्ड मोडला आहे.
SL/KA/SL
22 May 2023