विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त सदस्यांचा स्नेहमेळावा

 विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त सदस्यांचा स्नेहमेळावा

मुंबई दि ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विद्यमान आणि माजी विधानपरिषद सदस्यांसाठी परिसंवाद तसेच स्नेहमेळावा ८ नोव्हेंबर, २०२३ रोजी सकाळी ११.१५ वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानपरिषदेतील गटनेते आणि सदस्य यांची बैठक गेल्या महिन्यात घेण्यात आली होती. या बैठकीतील निर्णयानुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, मंत्री, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते तसेच अन्य मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.

स्नेहमेळावा आणि १) विधानपरिषद सभागृहाची आवश्यकता आणि महत्व २) आमच्या आठवणीतील विधानपरिषद (असे सदस्य…असे प्रसंग) या दोन विषयांवर परिसंवादांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभा अध्यक्ष मा. ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिली.

देशातील संसदीय लोकशाहीच्या संदर्भात व्दिसभागृह व्यवस्थेत महाराष्ट्र विधानपरिषदेने उल्लेखनीय योगदान देत आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविला आहे. माँटेग्यू-चेम्सफर्ड शिफारशीनुसार भारत सरकार अधिनियम, १९१९ अन्वये “Bombay Legislative Council” ची प्रारंभिक बैठक १९ फेब्रुवारी, १९२१ रोजी टाऊन हॉल मुंबई येथे झाली.

नारायण गणेश चंदावरकर यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी झालेली नियुक्ती ही एक ऐतिहासिक घटना होती. सन १८६२ ते सन १९२० पर्यंत Governor of Bombay यांच्या अध्यक्षतेखाली Council चे कामकाज चालत होते. सन १९२१ मध्ये नारायण चंदावरकर यांच्या रुपाने पहिल्यांदा भारतीय व्यक्तीची सभापती म्हणून नियुक्ती झाली. सन १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधानपरिषद शतकपूर्तीचा कालखंड मानता येईल. तथापि, कोविड – १९ महामारीमुळे त्‍यावेळी जाहीर कार्यक्रम घेणे शक्य झाले नाही.

विधानपरिषदेच्या विद्यमान आणि माजी सदस्यांना ८ नाव्हेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमास निमंत्रित करण्यात आले असून यानिमित्त जुन्या आठवणींना तसेच विधानपरिषदेच्या शतकमहोत्सवी वाटचालीतील वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या प्रसंगांना उजाळा मिळणार आहे. त्याचप्रमाणे शतकमहोत्सवानिमित्त विधानपरिषद या दुसऱ्या सभागृहाचे महत्व आणि वैशिष्ट्य, गत शंभर वर्षातील महत्वपूर्ण विधेयके, ठराव, विधानपरिषदेमध्ये लोकहिताच्या महत्वाच्या प्रश्नांवर, विषयांवर झालेल्या चर्चा, शंभर वर्षे शंभर भाषणे आणि छायाचित्रांचे संकलन असलेले कॉफी टेबल बुक अशी पाच प्रकाशने प्रस्तावित असून यासंदर्भातील संपादन कार्यवाहीस प्रारंभ झाला आहे.

ML/KA/SL

7 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *