Meesho कंपनीला १५०० कोटींची टॅक्स नोटीस
मुंबई, दि. 9 : ई-कॉमर्स क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी Meesho ला आयकर विभागाने १,५०० कोटी रुपयांच्या कर मागणीची नोटीस बजावली आहे. यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांची घसरण होऊन गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. Meesho च्या एक्सचेंज फायलिंगनुसार, आयकर विभागाने २०२३-२४ या मूल्यांकन वर्षासाठी एकूण १,४९९.७३ कोटी रुपयांच्या कराची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीतील (Q3) एकूण महसुलाच्या (३,५१७ कोटी रुपये) जवळपास निम्मी आहे. या नोटीसमध्ये व्याजाचाही समावेश आहे. मात्र, कंपनीने या नोटीसवर असहमती दर्शवली असून, याविरोधात कायदेशीर पावले उचलणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Meesho ही भारतातील एक आघाडीची ई-कॉमर्स कंपनी असून ती प्रामुख्याने लघु उद्योग आणि वैयक्तिक विक्रेत्यांना ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. स्वतःच्या ‘वाल्मो’ (Valmo) या लॉजिस्टिक नेटवर्कद्वारे कंपनी देशभरात स्वस्त दरात डिलिव्हरी सेवा पुरवते.