२४ वर्षांपूर्वीच्या बदनामीच्या गुन्ह्यामध्ये मेधा पाटकर दोषी
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar) यांना दिल्लीच्या साकेत न्यायालयाने 2001 सालच्या एका प्रकरणात दोषी ठरवलं आहे. दिल्लीचे सध्याचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना (Delhi Lt Governor VK Saxena) यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात मेधा पाटकर यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. व्हीके सक्सेना यांनी मेधा पाटकर यांच्यावर खोटे आरोप, उपहासात्मक वक्तव्ये आणि बदनामी केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. व्हीके सक्सेना यांनी गुजरातच्या संसाधनांचा परकीय हितसंबंधासाठी वापर केल्याचा आरोप मेधा पाटकर यांनी केला होता.
सक्सेना यांच्याविरोधात मेधा पाटकर यांनी केलेली वक्तव्ये केवळ बदनामीकारकच नाहीत, तर ती नकारात्मक गोष्टींना चालना देतात असं निरीक्षण दिल्ली न्यायायलाने नोंदवलं आहे. न्यायालयाचे म्हणणे आहे की, मेधा पाटकर यांनी केवळ व्हीके सक्सेना यांची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी चुकीची माहिती देऊन आरोप केले होते, हे नि:संदिग्धपणे सिद्ध झाले आहे.
मेधा पाटकर यांनी आयपीसीच्या कलम 500 अंतर्गत दंडनीय गुन्हा केला असून त्या दोषी ठरतात. त्यांनी जाणूनबूजून तक्रारदाराची बदनामी केली. मेधा पाटकरांनी जे काही आरोप केले ते फक्त तक्रारदाराची बदनामी करण्यासाठीच होते. मेधा पाटकरांच्या कृतींमुळे लोकांच्या नजरेत सक्सेना यांची प्रतिष्ठा आणि त्यांच्या विश्वासार्हतेला खरोखरच मोठे नुकसान झाले आहे, असे न्यायालयाचे म्हणणे आहे.
SL/ML/SL
24 May 2024