सावध रहा, मुंबईत लहान मुलांमध्ये गोवराचा प्रादुर्भाव वाढतोय

 सावध रहा, मुंबईत लहान मुलांमध्ये गोवराचा प्रादुर्भाव वाढतोय

मुंबई,दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या काही भागात लहान मुलांमध्ये गोवर पसरला असून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत सध्या गोवरचे 109 रुग्ण आहेत. तर 617 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत गोवरमुळे तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबईत केंद्रीय आरोग्य पथक निर्माण झालं असून त्यांच्याकडून विविध रुग्णालयांमध्ये आणि वस्त्यांमध्ये पाहणी सुरू आहे.मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत 9 लाखहून घरांचं सर्वेक्षण केलं आहे. या अंतर्गत आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन बालकांची आरोग्य तपासणी करत आहेत.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात मुंबईत गोवरचे सर्वाधिक रुग्ण आढळल्याचं स्पष्ट झालं आहे. या दोन महिन्यात गोवरच्या 84 रुग्णांची नोंद मुंबईत झाली आहे. मुंबईतील गोवंडी परिसरात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

प्रामुख्याने पाच वर्षाखालील बालकांमध्ये हा आजार आढळत असल्याने कुटुंबियांनी गोवरच्या लक्षणांवर लक्ष ठेवावं. तसंच  गोवर हा वेगाने पसरणारा आजार असल्याने लहान मुलांमध्ये गोवरची लक्षणं दिसल्यास तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करा असं आवाहन  मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केलं आहे.

SL/KA/SL

14 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *