दुधात भेसळ केल्यास आता लागणार MCOCA

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात दूध आणि अन्नपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीच्या घटनांबाबत विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल,असा ठाम इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. यासाठी विद्यमान कायद्यात सुधारणा करून मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे.
या बैठकीस अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री योगेश कदम, तसेच विविध आमदार आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. सोलापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या चर्चेत सहभागी झाले होते.
दरम्यान सोलापूर जिल्ह्यात उघडकीस आलेल्या दूध भेसळ प्रकरणात कोणताही आरोपी वाचणार नाही,असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. कोणत्याही पक्षाचा असो, कितीही मोठा असो – दोषींवर तातडीने अटकेची कारवाई केली जावी, असे आदेश सोलापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.
SL/ML/SL
26 March 2025