मराठी फलक नसलेल्या 3 हजार दुकानांना मुंबई मनपाकडून नोटीस

मुंबई, दि. २१ : मुंबई महानगरपालिकेने मराठीत फलक न लावल्याबद्दल ३,०४० दुकाने व आस्थापनांवर नोटीसा बजावल्या आहेत. नुकत्याच झालेल्या मराठी भाषेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्य शासनाने २०२२ मध्ये एकमताने घेतलेल्या निर्णयानुसार कोणत्याही दुकानांवर व आस्थापनांवर इतर भाषेतील फलकापेक्षा मराठी भाषेत मोठा फलक लावण्याचा नियम तयार करण्यात आला. या निर्णयाला दुकानदारांच्या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली. ही स्थगिती २०२३ मध्ये उठवण्यात आली. त्यानंतर त्याचवर्षी दुकानदारांना मराठीत फलक लावण्यासाठी वेळ देण्यात आला होता मात्र त्यातील अनेकांनी आपले फलक मराठीत केले नाहीत.
पालिकेने म्हटले आहे की, आतापर्यंत मराठीत फलक नसलेल्या ५२२ दुकानांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ४६ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. सध्या मुंबईत १० लाख दुकाने असून त्यातील पन्नास टक्क्यांहून अधिक दुकानांवर मराठीत फलक नाहीत. यातील तीन हजार दुकानांना नव्याने नोटीसा देण्यात आल्या असून त्यांच्यावर प्रत्येकी दीड ते दोन हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. या नोटीसींच्या अंमलबजावणीसाठी पालिकेने विविध प्रभागांमध्ये ६० निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यांना दररोज दोन ते तीन हजार दुकानांची तपासणी करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे.
SL/ML/SL