सेंट्रल मार्ड, पालिका मार्डसोबत आता बंधपत्रित डॉक्टरही संपाच्या पवित्र्यात
मुंबई दि.30(एम एमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील रिक्त जागा व 2018 पासूनची थकीत देणी देण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी येत्या 2 जानेवारी पासून सेंट्रल मार्ड, पालिका मार्डसोबत आता बंधपत्रित डॉक्टरने ही संपाची हाक दिली आहे.त्यामुळे राज्यातील रुग्णसेवा विस्कळीत होण्याची भिती निर्माण झालेली आहे.
राज्यातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या 1432 जागा भरण्यात याव्यात ,2018 पासूनची सर्विस देण्यात यावी,सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यापकांच्या जागा तात्काळ भरण्यात याव्यात या महत्वाच्या मागण्यांसाठी येत्या 2 जानेवारी पासून महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर असोसिएशन अर्थात मार्ड यांनी संपावर जाण्याचा इशारा राज्यातील एकनाथ शिंदे सरकारला दिला आहे.त्यामुळे राज्यातील रुग्णसेवा विस्कळीत होऊन संकटात जाण्याची भिती निर्माण झालेली आहे.
यासोबत आता बंधपत्रित डॉक्टर आणि महापालिका मार्डचे निवासी डॉक्टर देखील आपापल्या मागण्यासाठी संपावर ठाम असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते.
वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चौदाशे जागा निर्माण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी.महागाई भत्ता लागू करावा.त्यात असलेली 2018 पासूनची थकबाकी देखील देण्यात यावी.
विविध काळात नायर रुग्णालयात रुग्ण सेवा करणाऱ्या डॉक्टरांची दहा हजार रुपये कपात करण्यात आली होती. त्यांना ती कपात केलेली रक्कम लवकरात लवकर मिळावी,डॉक्टरांच्या निवासी घरांचा प्रश्न सोडवावा.अशा विविध मागण्यांसाठी महापालिका मार्डच्या डॉक्टरांनी सेंट्रल मार्डच्या आंदोलनात सहभाग घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
यासोबत वरिष्ठ डॉक्टरांची संघटना महाराष्ट्र असोसिएशन ऑफ बाँडेड रेसिडंट डॉक्टर्स म्हणजेच एमएबीएआरडीकडून संपाचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून बंधपत्रित वरिष्ठ डॉक्टरांची संघटना एमएबीएआरडीकडून मागण्यांसाठी पाठपुरावा केला जात आहे; मात्र त्याकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात येत असल्याने कंटाळून 2 जानेवारीपासून काम बंदचा इशारा देण्यात आला असल्याचे एमएबीएआरडी संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.
वरिष्ठ डॉक्टरांच्या मागण्यांसाठी वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाचे संचालक,आयुक्त तसेच विभागाचे सचिव यांच्याकडे पाठपुरावा केला जात आहे.
यातील मागण्यांप्रमाणे बंधपत्रित निवासी डॉक्टर ही आठवड्याचे सात दिवस चोवीस तास काम करत असतात.त्यामुळे त्यांनाही महागाई भत्त्याचा समान अधिकार आहे.
यात संरचनात्मक बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे.त्याचसोबत बंधपत्रित निवासी डॉक्टरांच्या पगारात 2018 मध्ये वाढ करण्यात आली; मात्र ही वाढ अद्याप देण्यात आलेली नाही, असे संघटनेने म्हटले आहे.त्यामुळे जर असे आंदोलन झाले तर रुग्णसेवेवर मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवणार असल्याचे दिसून येत आहे.
SW/AK/SL
30 Dec. 2022