मीरा-भाईंदरच्या विकास प्रवासाला नवी गती !
मीरा-भाईंदर दि ३ :
मीरा-भाईंदरकरांच्या अनेक दशकांच्या प्रतीक्षेला पूर्ण विराम देत आधुनिक एसटी डेपो, पार्किंग प्लाझा आणि मार्केट यार्ड प्रकल्पाचा भव्य भूमिपूजन सोहळा परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या पुढाकारातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भाईंदर रेल्वे स्टेशन पश्चिम येथे संपन्न झाला. हा ऐतिहासिक क्षण शहराच्या नावावर कोरला गेला.
भाईंदर पश्चिम येथील बस आगाराची दयनीय अवस्था तसेच कोसळण्याच्या स्थितीतील छप्पर, अस्वच्छ पाणी, बसण्याची कमतरता, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यामुळे नागरिक व एसटी कर्मचारी अनेक अडचणींना सामोरे जात होते. या बिकट परिस्थितीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्तक्षेपाने निर्णायक कारवाई झाली आणि नव्या डेपोची प्रक्रिया वेगात आली.
मीरा -भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे ४० हजार मीटर जागेमधून सीआरझेडमुळे फक्त ७ हजार ४०० मीटरवर बांधकामास परवानगी मिळाल्यानंतर नव्या संकल्पनांचा आराखडा तयार करण्यात आला. या नवीन आराखड्यानुसार नवीन इतरतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानयुक्त परिवहन विभाग कार्यालय, कर्मचाऱ्यांसाठी विश्रांती गृह व सुरक्षित सुविधा, प्रशस्त बसविहार जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी मंत्री सरनाईक यांनी सांगितले. तसेच यावेळी राखीव परिसराजवळ भव्य पार्किंग प्लाझा आणि भव्य मार्केट यार्ड उभारण्यात येणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली.
स्थानिक व्यापाऱ्यांसाठी ‘हक्काचे’ मार्केट!
गेल्या कित्येक वर्षांपासून भाईंदर पश्चिम येथे खुल्या जागेवर मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी व्यवसाय करून रोजगार मिळवत आहेत. आता त्यांच्यासाठी आरक्षित जागेत प्रशस्थ असे मार्केट उभारण्यात येणार असल्याची विशेष घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. शहरातील पारंपरिक व्यवसायाला नवा श्वास देणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे.
बहुमजली पार्किंग प्लाझा, स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी उभारी!
मीरा-भाईंदरच्या वाढती लोकसंख्या आणि वाहनभार लक्षात घेता राज्यातील पहिलाच पीपीपी मॉडेलवर उभारला जाणारा बहुमजली पार्किंग प्लाझा येथे निर्माण होणार आहे. तसेच मार्केट यार्ड लागत जवळजवळ १०० दुचाकी आणि बेसमेंट मध्ये ७० चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे शहरातील वाहतूक आणि पार्किंगच्या समस्येवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
तसेच नवीन मार्केट यार्डमुळे स्थानिक व्यापार वाढेल, रोजगार निर्मितीला चालना मिळेल, शहराच्या अर्थव्यवस्थेत ताजे प्राण फुंकले जातील. याबाबत स्वतः मंत्री प्रताप सरनाईक यांनी आश्वासन देत हा प्रकल्प मीरा-भाईंदरच्या आर्थिक प्रगतीचा नवा टप्पा असल्याचे स्पष्ट केले.
आता ठाणे-बोरिवली-मुंबईला जाण्याची गरज नाही!
मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना गावी जाण्याकरिता आणि वेगवेळ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ठाणे, बोरीवली, मुंबई या बस आगरांवर अवलंबून राहावे लागत होते. परंतु आता नव्याने तयार होणाऱ्या या बस आगरामुळे ही अडचण देखील दूर झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या एसटी गाड्या आता याच नव्या डेपोतून धावणार. शहरातील लाखो प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा आहे.
या प्रसंगी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणतात कि, “हे फक्त बसस्थानक किंवा ऑफिस नाही, तर मीरा-भाईंदरच्या विकासाचा नवा सुवर्णअध्याय आहे. नव्या एसटी आगरामुळे शहरातील प्रवासी-सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि व्यवसायाला अभूतपूर्व वेग मिळणार आहे. भाईंदर पश्चिमच्या मध्यवर्ती ठिकाणी उभा राहणारा हा प्रकल्प मीरा-भाईंदरच्या विकास प्रवासात सुविधा, सुरक्षितता, आधुनिकता आणि स्थानिक विकासाचा भक्कम संगम तसेच ‘सुवर्णक्षण’ ठरणार आहे. हा केवळ प्रकल्प नाही, हे मीरा-भाईंदरच्या उज्ज्वल भविष्यासाठीची नवी दिशा आहे. मीरा -भाईंदर शहरातील जनतेला जास्तीत जास्त अद्यावत सुविधा देणे ही माझी जबाबदारी आहे. मी एका मतदारसंघाचा आमदार नाही मी महाराष्ट्राचा मंत्री आहे. त्यामुळे मीरा -भाईंदर शहराचा विकास करणं आणि मीरा -भाईंदर शहराने पाहिलेली सर्व स्वप्न पूर्ण करणार हि माझी जबाबदारी आहे. देशातील सर्वात जास्त विकसित शहर म्हणून मीरा -भाईंदर शहराचे नाव व्हावे असा माझा संकल्प आहे.”ML/ML/MS