15 लाख घेऊन NEET मध्ये डमी उमेदवार बनले MBBSचे विद्यार्थी
झालवाड,दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : NTA कडून घेण्यात आलेली NEET 2024 ची परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दररोज देशाच्या विविध भागांतून या परीक्षेदरम्यानच्या गैरप्रकारांत सहभाग असलेल्या व्यक्तींची नावे समोर येत आहेत. आज या प्रकरणी डमी उमेदवार म्हणून परीक्षा देणाऱ्या MBBS च्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलिस आणि मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने NEET मध्ये डमी उमेदवार म्हणून बसलेल्या 10 वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक केली आहे. त्यापैकी 8 जणांना जामीन मिळाला आहे. यांनी या कामासाठी उमेदवारांकडून प्रत्येकी १५ लाख रू. घेतल्याची माहितीही समोर आली आहे. मुंबई गुन्हे शाखेचे पथक दोन विद्यार्थ्यांची चौकशी करत आहे. हे सर्व विद्यार्थी राजस्थानचे रहिवासी असून एमबीबीएस प्रथम वर्षापासून ते इंटर्नशिपपर्यंतचे आहेत.
झालवाड येथील मेडिकल कॉलेजचे सहायक शैक्षणिक प्राध्यापक डॉ. मयंक जैन म्हणाले – 15 दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांच्या तपास पथकाने आमच्याकडे 8 विद्यार्थ्यांची माहिती विचारली होती. आम्हाला विद्यार्थ्यांची नावे सांगण्यात आली. हे सर्व विद्यार्थी झालावाड मेडिकल कॉलेजचे होते. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर 8 विद्यार्थ्यांना जामीन मंजूर करण्यात आला. तर मुंबईच्या पथकाने दोन विद्यार्थ्यांची आधी चौकशी केली आणि नंतर त्यांना अटक केली. सध्या दोन्ही विद्यार्थी मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत.
डॉ. मयंक जैन म्हणाले- केंद्रातून एकाही विद्यार्थ्याला अटक करण्यात आलेली नाही. आम्ही दिल्ली पोलिसांच्या तपास पथकाला माहिती दिली असता विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्यांवर प्रत्येकी 15 लाख रुपये घेऊन डमी उमेदवार म्हणून परीक्षेला बसल्याचा आरोप आहे. यामध्ये काही विद्यार्थिनीही आहेत.
या प्रकरणाची कोणतीही माहिती झालवाड मेडिकल कॉलेज प्रशासनाने अद्याप दिलेली नाही. वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ.सुभाषचंद्र जैन यांनी प्रकरण पुढे ढकलले. मेडिकल कॉलेजच्या अधिकाऱ्यांनीही ही बाब लपवून ठेवली. झालवाडच्या एसपी रिचा तोमर म्हणाल्या की, मेडिकल कॉलेजच्या प्रकरणाबाबत पोलिसांकडे कोणतीही माहिती नाही.
SL/ML/SL
28 June 2024