भाई सुभाषचंद्र मयेकर यांना ‘लोकसेवक’ पुरस्कार
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात मोठ्या विविध पदांवर प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले प्रख्यात कवी, साहित्यिक सुभाषचंद्र शांताराम उर्फ भाई मयेकर यांना नुकताच एकता कल्चरल अकादमीचा २०२५-२०२६ चा ‘लोकसेवक’ पुरस्कार एका शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ पत्रकार, नवशक्ति चे माजी संपादक प्रकाश कुलकर्णी, भगवान निळे, सदानंद राणे, अजय कांडर, शरण बिराजदार, डॉ. रमेश यादव, प्रदीप म्हापसेकर, गंगाधर म्हात्रे, अनिल गवस आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत गिरगाव येथील मुंबई मराठी साहित्य संघाच्या सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. भाई सुभाषचंद्र मयेकर यांनी भारताच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक उत्तमप्रकारे पार पाडण्यासाठी विधानमंडळ सचिवांना सहाय्य केले असून विधानपरिषदेच्या निवडणुकांचे मतदान आणि मतमोजणी याचे संचालन करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.
विधानपरिषद सदस्यांच्या निवडणुकीत प्राधान्यक्रमाने मतमोजणी करण्याची प्रक्रिया खूप किचकट असते. या कार्यात भाई मयेकर हे कुशल अधिकारी म्हणून ओळखले जातात. विधानमंडळ सचिवालयात नियम, वैधानिक अस्त्रांचे उत्तम ज्ञान भाई सुभाषचंद्र मयेकर यांना असल्याने ते अत्यंत लोकप्रिय झाले आहेत. त्यांचे अनेक कवितासंग्रह प्रकाशित झाले असून प्रसंगोपात, समयोचित कविता करण्यात त्यांचा हातखंडा आहे. एकता कल्चरल अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव, कोषाध्यक्ष दिनेश मोरे, श्वेता जाधव , उपाध्यक्ष उज्जय आंबेकर, सचिव प्रकाश पाटील यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. अनिल पाटसकर आणि किर्ती पाटसकर यांनी समयोचित सूत्रसंचालन केले तर प्रकाश पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.ML/ML/MS